दोन दिवसांपूर्वी (24 जानेवारी) एकाच कुटुंबातील सातही जणांचा मृत्यू हा अपघात नसून हत्या आहे, असं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं. कौटुंबिक वादातून हत्या केली आहे, असंदेखील पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सातही जणांचे मृतदेह यवतमध्ये पुरण्यात आले होते. त्यानंतर पोलीस बाकी तपास करत होते. मात्र पोलिसांनी त्यांचा सखोल तपास सुरु ठेवला. त्यासाठी त्यांनी आता तीन जणांचे पूरलेले मृतदेह पुन्हा बाहेर काढले आहेत. याच सात मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे शवविच्छेदन आज (26 जानेवारी) करण्यात येणार आहे. यवत ग्रामीण रुग्णालयात तीन मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
सात जणांची हत्या अन् पाच जणांना अटक
अशोक पवार, श्याम पवार, शंकर पवार, प्रकाश पवार, कांताबाई जाधव, या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे पाचही जण मृत कुटुंबियांचे नातेवाईक आहेत. मोहन पवार (45), संगिता पवार (40), राणी फुलवरे, श्याम फुलवरे, रितेश फुलवरे, छोटू फुलवरे, कृष्णा फुलवरे,अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. मोहन आणि त्यांचे कुटुंबीय 17 जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली. त्यांना बेशुद्ध करुन नदीत फेकलं होतं. घडलेल्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाता तपास करण्यासाठी काही विशेष पथकदेखील तयार केले आहेत.
मृतदेह बाहेर काढल्याने गुढ वाढलं...
मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा इथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात धनंजय पवार यांचा मृत्यू झाला होता. काळी जादू केली असं पवार कुटुंबियांचं म्हणणं होतं. पोलीस तपासात यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र आता मृतदेह बाहेर काढून नेमकी कोणती धक्कादायक माहिती समोर येईल, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.