Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) डोळ्यासमोर ठेवून सर्वच प्रमुख पक्षांनी लोकसभा जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. तर भाजपनेही निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकांबाबत सर्वसामान्यांचा मूड जाणून घेण्यासाठी सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुका झाल्या तर देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार परत येण्याची शक्यता वर्तवली आहे. 


सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात एनडीएला 543 पैकी 298 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 153 जागा मिळताना दिसत आहेत. इतर पक्षांना 92 जागा मिळू शकतात. एनडीएला जवळपास 43 टक्के मते मिळू शकतात. तर यूपीएला 29 टक्के आणि इतर पक्षांना 28 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 


Lok Sabha Election :  कोणत्या पक्षाला किती जागा?


सर्वेक्षणानुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 284, काँग्रेसला 68 आणि इतरांना 191 जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर भाजपला 39 टक्के मते मिळत आहेत, तर काँग्रेसला 22 टक्के आणि इतरांना 39 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 


Lok Sabha Election :  गेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल


2019 मध्ये देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने पुनरागमन केले आणि सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 303 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 353 जागा जिंकल्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएने 91 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला 52 तर इतर पक्षांना 98 जागा मिळाल्या होत्या.


Bjp Mission 144 : काय आहे भाजपचे मिशन 144? 


दरम्यान, भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची राजकीय आखण्यास सुरुवात केली आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक आता एका वर्षावर आलीय. सलग तिसऱ्या विजयासाठी भाजपने नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे.  भाजपने 2024 च्या लोकसभेसाठी मिशन 144 सुरु केलं आहे. देशातील 144 लोकसभा मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. यापैकी बहुतांश मतदारसंघात भाजपला विजय मिळालेला नव्हता. अशा 144 मतदारसंघात भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली, सपाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचा मनिपुरी, महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांचा बारामती, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या मीमी चक्रवर्ती यांच्या जादवपूर, तेलंगाणामध्ये टीआरएसच्या श्रीनिवास रेड्डी यांच्या महाबुबनगर, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या नकुल नाथ यांच्या छिंदवाडा मतदारसंघामध्ये भाजप ताकद लावणार आहे. या 144 लोकसभा मतदारसंघांपैकी 10 ते 12 मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या सभांचं आयोजन करण्यात येणार आहे.