मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर टीका केली, पण सोबतच सत्तेत सोबती असलेल्या काँग्रेसवर (Maharashtra Congress) देखील स्वबळाच्या मुद्द्यावरुन टोला लगावला आहे. शिवसेनेच्या (shiv sena) वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावर स्वबळाची भाषा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंचे भाषण सत्ताप्रमुखाचे नव्हे तर गँगप्रमुखाचे! भाजपची टीका
काय म्हणाले नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी ठाकरे शैलीत भाषण केलं आहे. मात्र ते कोणाला उद्देशून केलं आहे याची स्पष्टता नाही. त्यामुळे त्यांची स्पष्टता आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देईल. भाजपनेही स्वबळाचा नारा दिला होता. प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहे, असं म्हणत पटोले यांनी शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांचं स्वबळावर भाष्य
अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली तेंव्हा मराठी माणूस क्षुल्लक होता. मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. शिवसेना तेंव्हा स्थापन झाली नसती तर... जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे ते म्हणायचे आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्त्वाचं आहे, असं ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले होते नाना पटोले
आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून आमच्या मित्र पक्षांचं काय प्लानिंग आहे याबद्दल मला कल्पना नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. नाना पटोले म्हणाले होते की, "ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल. ते आमचे मित्र पक्ष आहेत आणि मित्र पक्षांचं प्लानिंग वेगळं असेल, आम्ही काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केलीय. विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळे बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आज आमच्या समोर त्यांचा कुठला प्रस्ताव नाही."
सत्ता प्रमुखाचे नव्हे तर गँग प्रमुखाचे भाषण- सुधीर मुनगुंटीवार
भाजप नेते आमदार सुधीर मुनगुंटीवार यांनी म्हटलं आहे की, शिवसेना वर्धापन दिनाचे उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे सत्ता प्रमुखाचे नव्हे तर गँग प्रमुखाचे भाषण आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, 2 दिवसाआधी आपण गुंड आहोत म्हणून सांगितले. आता काँग्रेसला स्वबळाच्या नाऱ्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा केली जात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. हिंदुत्वाची व्याख्या भारताला आधीच कळली आहे, तुम्ही सांगण्याची गरज नाही, मात्र शेवटी शिवसेनेची त्यातली भूमिका कोणती आहे? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला. शिवसेना वर्धापनदिन भाषण केवळ खुर्चीभोवती फिरले आणि हे भाषण कार्यकर्त्यांपुढे आपण घेतलेल्या भूमिकेचे उदात्तीकरण असल्याची टीका त्यांनी केली.