बुलढाणा : आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून आमच्या मित्र पक्षांचं काय प्लानिंग आहे याबद्दल मला कल्पना नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नाना पटोलेंनी आपल्या या वक्तव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं तर दाखवून दिलं नाही ना? असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे. मात्र तिकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आघाडीसाठी प्रयत्न असल्याने आगामी काळात महाविकास आघाडीत ताण तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल. ते आमचे मित्र पक्ष आहेत आणि मित्र पक्षांचं प्लानिंग वेगळं असेल, आम्ही काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केलीय. विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळे बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आज आमच्या समोर त्यांचा कुठला प्रस्ताव नाही."


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल बुलढाण्याच्या दौऱ्यावर होते, दौऱ्याचा मुख्य उद्देश कोविड परिस्थितीचा आढावा घेण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र हा राजकीय गाठी भेटीचा दौरा असल्याचं स्पष्ट दिसत होतं. कोविड सेन्टरला पाच मिनिटांची भेट तर कार्यकर्त्यांचा मेळावा तीन तीन तास चालल्याने हा दौरा राजकीय असल्याचं स्पष्ट झालं. पटोलेंचा हा दौरा रात्री उशीरापर्यंत सुरुच होता.


नाना पटोलेंनी आम्ही आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सांगून महाविकास आघाडीवर दबाब निर्माण केल्याचं चित्र होत. मात्र महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले असल्याचं चित्र बुलढाण्यात आहे. बुलढाण्यात नाना पटोले यांनी मेहकर, चिखली, बुलढाणा, खामगाव व शेगाव येथे आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन मार्गदर्शन केलं व तिथल्या पाचही ठिकाणी कोविड सेंटरला भेट देण्याचा देखावा ही केला. यामुळे विरोधक या दौऱ्यावर टीका करत असल्याचंही समोर आलं आहे. खामगावचे भाजपा आमदार आकाश फुंडकरांनी नाना पटोले यांच्या दौऱ्यावर टीका करताना म्हटलं की, जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने ते किडनी विकायच्या तयारीत आहे. मात्र त्याच जिल्ह्यात नाना पटोले सत्कारात मश्गुल आहेत.


 महत्वाच्या बातम्या :