(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Symbol : शिंदे-ठाकरे गटाची नावं ठरली, आज शिंदे गटाचं चिन्ह ठरणार; 'हे' चिन्ह मिळण्याची शक्यता
Shivsena Symbol : आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार शिंदे गट आज तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार आहे.
Shivsena Symbol : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला काल 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव देण्यात आलं असून त्यांना मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं दिसून आलं. दरम्यान, शिंदे गटाने दिलेल्या तीन चिन्हांच्या पर्यायापैकी एकही चिन्ह त्यांना मिळालं नाही. त्यासाठी आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार शिंदे गट आज तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार आहे. यावर आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
शिंदे गटाला आज चिन्ह मिळण्याची शक्यता
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली मुदत संपली आहे. दोन्ही गटांनी निवडणूक चिन्ह आणि नावांवरती तीन पर्यायाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला होता. शिवसेनेकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल हे 3 चिन्ह पाठवली होती. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावं सेनेनं निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गटाला काल 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव देण्यात आलं असून त्यांना मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार - एकनाथ शिंदे
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून काल उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. हा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीट करत म्हटलंय, "वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत"
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2022
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना pic.twitter.com/8UwEMxP3VC
दोन्ही गटाचे तीन पैकी दोन निवडणूक चिन्ह एकसारखे
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि शिंदे गटाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तीन पैकी दोन निवडणूक चिन्ह हे एक सारखे असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पसंती क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर देण्यात आलेल्या दोन्ही गटांच्या पर्यायांचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाने केला. शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना निवडणूक चिन्ह म्हणून मशाल हे चिन्ह मिळालं आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आज 'गदा' चिन्ह मिळण्याची शक्यता आहे
'ती' दोन्ही चिन्ह नाकारली
निवडणूक आयोग उगवता सूर्य आणि त्रिशूळ दोन्ही चिन्ह नाकारली आहे. शिंदे गटाकडून सुद्धा उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही चिन्हांवर दावा केला होता. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिंदे गटाकडून तीन नावं सुद्धा ठरली होती. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती