Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देणार?
Maharashtra Political Crisis: उद्या बहुमत चाचणी होणार की नाही यावरच आता उद्धव ठाकरे सरकारचा फैसला होणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज सर्व सहकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली. उद्या बहुमत चाचणी होणार की नाही याचा फैसला काहीच वेळात होणार आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते. आपल्याकडून कुणाचा अपमान झाला असेल किंवा कुणी दुखावलं गेलं असेल तर मला माफ करा असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच आपल्याला सर्वांनीच सहकार्य केलं, पण माझ्याच लोकांनी धोका दिला असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि आपल्या समर्थक आमदारांसह ते थेट सुरतमार्गे गुवाहाटीमध्ये पोहोचले. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील एकेक आमदार शिंदे गटामध्ये सामिल होऊ लागला. आता शिंदे गटाकडून त्यांच्याकडे 50 आमदार असल्याचा दावा करण्यात आला. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत त्यांनी शिवसेना सोडली नसल्याचंही सांगितलं. त्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला.
त्यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला गुरुवारी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश दिले. यासाठी शिंदे गटातील बंडखोर आमदार हे गुवाहाटीवरुन गोव्यामध्ये आले आहेत. ते उद्या मुंबईत येणार असून थेट बहुमत चाचणीसाठी हजर राहणार असल्याची माहिती आहे.
राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना ही बहुमत चाचणी कशी करता येईल असं सांगत शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली. यावर दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. आता 9 वाजता यासंबंधी निकाल लागणार आहे.