maharashtra political crisis : गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही; आदित्य ठाकरेंचा इशारा
maharashtra political crisis : ज्या आमदारांनी बंडखोरी केलीय त्यांच्या कार्यालयांवर आणि घरांवर शिवसैनिकांकडून हल्ले होत आहेत. यातच आता आदित्य ठाकरे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

maharashtra political crisis : "हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि पुन्हा निवडून येवून दाखवा असे आव्हान देत गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही, असा इशार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना दिलाय. आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.
सर्व काही देऊन देखील शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. परंतु, या बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलाय. बंडखोरी केलेले 15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. परंतु, गद्दारांना क्षमा नाही. अडीच वर्षे तुमचे हिंदुत्व कुठे होते? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेचा रोज एक आमदार शिंदे यांच्या गटात सामिल होत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधलाय. शिवाय राज्यभर ज्या आमदारांनी बंडखोरी केलीय त्यांच्या कार्यालयांवर आणि घरांवर शिवसैनिकांकडून हल्ले होत आहेत. यातच आता आदित्य ठाकरे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, "आमदार दिलीप लांडे हातात हात घालून रडले होते. गाडीजवळ येऊन शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे, असे सांगितले. परंतु, ते देखील शिंदे गटात सामिल झाले. माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की दिलीप लांडे असा निर्णय कसा घेऊ शकतात.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती
आदित्य ठाकरे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. 20 मे रोजी त्यांच्यासोबत बोलणे झाले होते. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारले होते. परंतु, तरी देखील त्यांनी असा निर्णय कसा काय घेतला? मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ केली होती. चर्चेनंतर बरोबबर एक महिन्यातच एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली."























