Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोडीवर राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल असे म्हटले आहे.
"महाविकास आघाडीचे सरकार टीकवण्यासाठी सगळे प्रयत्न करू. परंतु, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिलाय. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर शरद पवार लक्ष ठेवून आहेत. काल सांयकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. त्याआधी शरद पवार यांनी सरकार कोसळलं तर आम्ही विरोधी बाकावर बसू असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं.
राज्यातील वेगवान घडामोडींमुळे मागच्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांच्या देखील बैठका होत आहेत. आजही मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. सरकार गेलं तर संघर्षाची तयारी ठेवा, अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना दिल्याची माहिती पुढे येत आहे. आज झालेल्या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
दरम्यान, शरद पवार हे राज्यातील गृहखात्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या नेृत्वाला शिवसेनेचे आमदार बंड पुकारुन भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात राज्याच्या गृहखात्याबरोबरच गुप्तचर यंत्रणांना अपयश आल्याचं शरद पवार यांचं मत असून त्यांनी उघडपणे दिलीप वळसे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या