मुंबई: शिवसेनेचे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांनी सुटका करुन पळून आल्याचा दावा खोटा असल्याचं बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. त्यासंबंधी देशमुख यांचा एक फोटो शेअर करण्यात आला असून देशमुख यांना स्पेशल चार्टर विमानाने नागपूरला पोहोचवण्यात आल्याचं या गटाकडून स्पष्ट करण्यात आलं. 


गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील पॉलिटिकल ड्रामा काही संपायचं नाव घेत नाही. त्यात आता रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे गटावर आणि भाजपवर काही आरोप केले होते. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं. माझा घात करण्याचा प्रयत्न होता असा आरोप त्यांनी राज्यात परत आल्यावर केला होता.


नितीन देशमुखांनी केलेला हा आरोप आता खोटा असल्याचं एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आलं. नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले असल्याचं सांगण्यात येत असून त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्यात आली आहेत. नितीन देशमुखांच्या सोबत दोन कार्यकर्ते दिले असल्याची माहितीही शिंदे गटाकडून करण्यात आली. 


शरद कणसे आणि  चेरी डेविड असं या दोन व्यक्तींची नावं असून त्यांना नितीन देशमुख यांच्यासोबत पाठवण्यात आल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं गेलं. पत्नीची तब्येत खराब झाली आहे आणि मुलांना भेटायचं आहे असं देशमुखांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं. त्यानंतर त्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात सोडण्यात आलं. 


कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली; तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि शिवसेना आमदार श्री तानाजी सावंत यांनी केला. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली, त्यामुळे प्रचंड पाऊस पडत असताना ते 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं. आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्दैवी आहे, डबलढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्यापासून पक्षप्रमुखांनी सावध राहावं असंही ते म्हणाले. 


बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या 40 हून अधिक आमदारांचा मुक्काम सूरतमधील हॉटेलमध्ये होता. या आमदारांसोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश होता. परंतु काही शिवसेना आमदारांना जबरदस्तीने, मारुन मुटकून सूरतला नेल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला होता. शिवाय नितीन देशमुख यांचा फोन नॉट रिचेबल आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नितीन देशमुख यांच्याबाबत नेमकं काय घडलं याची चर्चा सुरु झाली. अखेर नागपुरात परतल्यानंतर त्यांनी आपण कशी सुटका करुन परतलो याची माहिती माध्यमांना सांगितली होती. 


काय म्हणाले होते नितीन देशमुख?
अकोल्यात परतल्यानंतर आमदात नितीन देशमुख म्हणाले होते की, "माझी तब्येत टकाटक आहे. तुमच्यासमोर मी चांगल्या परिस्थितीत आणि चांगल्या तब्येतीत उभा आहे. हॉटेलमधून 12 वाजता निघालो. तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. पण 100 ते 200 पोलीस माझ्या मागे होते. कोणत्याही वाहनात मला बसू दिलं जात नव्हतं.  तुम्हाला अटॅक आला आहे, उपचार करायचे आहेत असं सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेलं. मला अटॅक आला नव्हता. बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणतं होतं काय होतं मला माहित नाही. माझ्या शरीरावर चुकीचे उपचार करण्याचं षडयंत्र करायचं होतं. आमचे मंत्री होते म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो होतो. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार."


संबंधित बातम्या: