बारामती: यंदाची आषाढी एकादशी ही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते की देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार यावर जोरदार चर्चा रंगली असताना त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पांडुरंगाच्या मनात जो असेल त्याच्याच हस्ते यंदाच्या एकादशीची पूजा होणार असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पांडुरंगाच्या मनात जो असेल, त्याचाच हस्ते आषाढी एकादशीची पूजा होईल. सर्वांना सुखी ठेव, पाऊस पडू दे आणि राज्यावरचं संकट दूर होऊ दे असं साकडं त्यांनी पांडुरंगाला घातलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीनंतर राज्य सरकार जाणार की राहणार हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे यंदाची एकादशीची पूजा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार की देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज कवीवर्य मोरोपंतांच्या बारामती नगरीत भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. बारामतीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांचे स्वागत केले. पालखी सोहळा आज बारामतीच्या शारदा प्रांगणात मुक्कामी आहे. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सायंकाळची आरती करण्यात आली. बारामती शहरातील भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पालखी सोहळा उद्या सकाळी, बुधवारी इंदापूर तालुक्यातील सणसर मुक्कामी मार्गस्थ होणार आहे. बुधवारी पवारांच्या काटेवाडीत पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे रिंगण संपन्न होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- एका बाजूने डुकरं, नाल्याची घाण, कुत्रे म्हणायचं तर दुसऱ्या बाजूने समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?; एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रांना सवाल
- Jalna News : राज्यात सत्तांतर व्हावं यासाठी बंडखोरांना भाजपने 7000 कोटी रुपये दिले; चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक आरोप
- Maharashtra Political Crisis : गुलाबराव पाटलांनी पैसे घेऊन नगरसेवकांना कामे दिली; गुलाबराव वाघ यांचा गंभीर आरोप