जळगाव : आमदार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय गुलाबराव वाघ यांनी त्यांच्यावर पैसे घेऊन नगरसेवकांना कामे दिल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. वाघ यांच्या या आरोपामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत.  त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या कार्यंलयांवर हल्ले देखील करण्यात आले आहेत. याबरोबरच शिवसैनिक आता बंडखोरी केलेल्या आमदारांवर विविध आरोप देखील करत आहेत. गुलाबराव वाघ यांनी देखील असाच गंभीर आरोप गुलाबराव पाटील यांच्यावर केलाय.    


गुलाबराव वाघ हे गुलाबराव पाटील यांचे अत्यंत निवटवर्तीय मानले जातात. परंतु, आता त्यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ  उडाली आहे. जळगाव  येथील  धरणगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या  शिवसेनेच्या मेळाव्यात गुलाबराव वाघ यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. गुलाबराव पाटील यांनी पैसे घेऊन धरणगाव नगरपालिकेतील नगरसेवकांना कामे दिली  आहेत. फुकट कामे केली असती तर काय फरक पडला असता? मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांनी तसं केलं नाही. याचा मी साक्षीदार आहे आणि हे मी गुलाबराव पाटील यांच्यासमोर बोलण्यास देखील तयार असल्याचे गुलाबराव वाघ यावेळी म्हणाले.


"गुलाबराव पाटील यांच्या अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत. त्या सर्व बाहेर काढू, असा इशाराच गुलाबराव वाघ यांनी दिलाय. गुलाबराव वाघ यांच्या या आरोपांमुळे आता जळगाव जिल्ह्यात बंडखोर विरुद्ध शिवसैनिक यांच्यातील संघर्ष आणखी टोकाला जाणार असल्याचे बोलले जात आहे. 


गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जात असे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी देखील बंडखोरी करत गुवाहाटी गाटली. गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी केल्यापासून गुलाबराव वाघ चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये गुराबराव वाघ यांनी आमदार पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यातच आज त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे जळगावातील राजकारणाला एक वेगळे वळण लागल्याचे बोलले जात आहे.