मुंबई: शिवसैनिकांनो, परत फिरा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं आहे. हे आवाहन फेटाळताना त्यांनी मुख्यमंत्री तसेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. एका बाजूने शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, कुत्रे, मृतदेह म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी समेटाची हाक द्यायची याचा अर्थ काय असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.


काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा. तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?


 






दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना आपण कुणालाही बोलताना वाईट शब्द वापरले नाहीत असं म्हटलं आहे.


काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 
"आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनानं शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजुनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल."