Parbhani Crime News : मनसेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील (MNS Sachin Patil) यांच्या खुनाला सात दिवस उलटूनही आरोपी अटक नसल्याने आज मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चा दारात पोहोचताच पोलिसांनी आरोपी विजय जाधव याला अटक केली आहे. 


परभणी शहरातील शिवरामनगर येथे 5 सप्टेंबर रोजी रम्मी खेळताना मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील आणि विजय जाधव (Vijay Jadhav) यांच्यात तू मोठा की मी यावरून वाद झाला होता आणि याच वादातून विजय जाधव याने सचिन पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. या घटनेला आज सात दिवस होऊन गेले तरी आरोपी विजय जाधव हा फरार होता. त्यामुळे विजय जाधव याला अटक करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांकडून धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मयत सचिन पाटील यांची आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, भाऊ आणि सर्व कुटुंब सहभागी झाले होते. हे आंदोलन झाल्यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला आणि पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची भेट घेतली असताना त्याचेवेळी आरोपी विजय जाधव याला सेलूत पोलीस अटक केल्याची माहिती मीना यांनी दिली. यावेळी आरोपी विजय जाधव याला अटक केली असली तरी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मयत सचिन पाटील यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. 


काय आहे प्रकरण?


परभणी शहरातील शिवराम नगर येथील गिरीश रेवले यांच्या घरी कुणीही नसल्याने मयत सचिन पाटील, आरोपी विजय जाधव यांच्यासह काही मित्र रम्मी खेळत होते. यावेळी रात्री उशिरा विजय जाधव आणि सचिन पाटील यांच्यात तू मोठा की मी मोठा असे म्हणत वाद झाला, हाच वाद विकोपाला गेला आणि आरोपी विजय जाधवने त्याच्या गाडीतील चाकू काढून सचिन पाटील यांच्या मानेवर, पाठीवर वार केले. त्यावेळी इतर मित्रांनी आणि सचिन पाटील यांचे मोठे भाऊ संदीप पाटील यांनी सचिन पाटील यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. आणि सचिन पाटील यांचा मृत्यू झाला.   


परभणी येथे 5 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेला तब्बल सात दिवसांनी आरोपी विजय जाधव याला अटक करण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या :