Nashik Crime : 'माझ्या हरणीला, कारभारणीला भूतान झपाटलं, हे गाणं सर्वांनाच ज्ञात असून हे गाणं आजही तितकच लोकप्रिय आहे. मात्र आपल्या बायकोला भूतबाधा होऊ नये म्हणून एकाने चक्क गिधाडाचे पाय व मुंडके घरात लटकवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार वनविभागाच्या इगतपुरी (Igatpuri) तपास पथकाने उघडकीस आणला आहे.


काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) जवळील अंबोली फाटा परिसरात बिबट्याच्या कातडीचा तस्करी करणाऱ्या चौघांना इगतपुरी वनपथकाने बेड्या घातल्या होत्या. या प्रकरणी तपास सुरू असताना चौघांपैकी एका सशयितांच्या घरात ही अघोरी पूजा मांडल्याचे तपासात पुढे आले आहे. बायकोला भूतबाधा लागू नये यासाठी हा प्रकार केल्याचे संशयितांने सांगितले. सशयित दत्तू मौळे यांच्या मोखाडा तालुक्यातील चिंचुतारा येथील गावात असलेल्या झोपडीवजा घरात गिधाडाचे पाय व मुंडके लटकवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या पराकारणी इगतपुरी वनपथकाने हे सर्व अवयव ताब्यात घेतले आहेत. 


दरम्यान मागील आठवड्यात बिबट्याच्या कातडीची 17 लाखांत विक्री करण्यास निघालेल्या पालघर जिल्ह्यातील तस्करांना इगतपुरी वनपथकाने शिताफीने सापळा रचून हवेत गोळीबार करत अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना गिधाडाची शिकारीची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बिबट्याची तस्करी करणाऱ्या पैकी संशयित दत्तू मौळे यांच्या घरात हा अघोरी प्रकार आढळून आला आहे. बायको आजारी असते, तिला बाहेरची  बाधा होऊ नये म्हणून एका भोंदू बाबांच्या सांगण्यावरून घरात गिधाडाचे पाय व मुंडके लटकावून ठेवल्याचे संशयित दत्तू याने वनकोठडीत चौकशीत दरम्यान सांगितले.


दरम्यान दाट जंगल झाडीचा भाग असलेल्या त्र्यंबक तालुक्यातील हरसुल परिसरात या गिधाडाची शिकार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. संशयित दत्तू मौळे यांनी गलोलीच्या साहाय्याने नेम धरून गिधाडाची शिकार केली असून दहा पंधरा दिवसांपूर्वी गिधाडाची शिकार केली असल्याचे वनक्षेत्रपाल केतन बिरारीस यांनी सांगितले. त्यानंतर संशयित मौळे यांने शिकार  केल्यानंतर गिधाडाचे दोन्ही पाय, मानेपासून छातीपर्यंतचे मुंडके कापून घेऊन जात घरात टांगून ठेवल्याचे वन विभागाच्या तपासणीत समोर आले आहे.


आज पुन्हा न्यायालयात..
संशयित चौघा तस्करांची वनकोठडी आज संपत असून चौघांना आज न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. तसेच बिबट्याच्या कातडीसह जमिनीतून काढलेली बिबट्याची हाडे हे तपासणी करण्यासाठी नागपूरला प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर महत्त्वाच्या अनेक बाबींचा खुलासा होणार असल्याची माहिती वनरक्षक सहाय्यक वनरक्षक पवार यांनी दिली.