Nashik Water Crisis : एकीकडे डिजिटल इंडियाचा (Digital India) गवगवा सुरु असताना आजही मायमाउल्यांना पाण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागत आहे. आज जून महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले असले तरीही अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने अनेक भागात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) ग्रामीण भागातील महिलांना वर्षभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या संदर्भातील आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. 


महाराष्ट्रातील अनेक भागात दरवर्षीं पाणी प्रश्न आ वासून उभा असतो. त्यामुळे अनेक भागात टँकरची व्यवस्था केली जाते, तर अनेक भागात महिला दरवर्षींप्रमाणे दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करुन पाण्याचा शोधार्थ भटकत असतात. हे चित्र कालही तसेच होते, आजही जैसे थे आहे. एकीकडे जलजीवनच्या माध्यमातून गावोगावी पाणी उपलब्ध झाल्याची चर्चा आहे, मात्र स्थानिक पातळीवर आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महिलांच्या नशिबी मरण यातना आहेत, शिक्षण, आरोग्यासह पाण्याची भीषण समस्या महिलांच्या जीवनातील महत्वाची भाग बनलेली आहे. याचा अभ्यास करत असतानाच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 


'ग्रामीण महाराष्ट्रात एक बाई पाण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 22,000 किलो वजन वाहते'


मयुरी धुमाळ (Mayuri Dhumal) या डेटा व्हॅल्यूज अॅडव्होकेट म्हणून हा प्रोजेक्ट करत आहेत. ग्रामीण भागातील मुलींच्या समस्यांवर काम करत असून त्यांनी प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष अहवालातून मांडला आहे. यासाठी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्याची निवड केली होती. या तालुक्यातील गावातील मुलींची आणि महिलांची पाण्यासाठी चालणारी अविरत धडपड, बायकांवर असणारी अलिखित जबाबदारी आणि ती पार पाडण्यासाठी त्या करतात, ते कष्ट मोजण्याचा, समजून घेण्याचा आणि त्याला डेटा म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. येथील महिला, मुलींनी या संशोधनात मांडलेल्या, सांगितलेल्या गोष्टीनुसार ग्रामीण महाराष्ट्रात एक बाई पाण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 22,000 किलो वजन वाहत असल्याचे समोर आले आहे. ज्याची तुलना एखाद्या कारच्या वजनाशी केल्यास ते जवळपास 11 कार्सच्या वजनाइतकं होतं, असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 


'पाण्याच्या एका नळाने महिलांचे प्रश्न सुटू शकतात' 


त्याचबरोबर या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक महिला जी पाण्यासाठी जीवाचं रान करत आहे, ती, त्या दिवसाला 60 किलो वजन घेऊन सरासरी 5 किलोमीटर चालून पाणी मिळवत आहे. हे चालणं वर्षाकाठी सुमारे 1800 किलोमीटर होत असल्याचा निष्कर्ष या अहवालातून समोर आला आहे. महत्वाचं म्हणजे हे अंतर आणि वजन उन्हाळ्यात किमान दुपटीने वाढतं. या पार्श्वभूमीवर धुमाळ सांगतात की, एकीकडे जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ आणि त्या नळाला दरदिवशी 55 लिटर पाणी मिळेल, असं सांगण्यात आले होते. त्याचबरोबर जलजीवनसारख्या असंख्य योजना आज राबवल्या जातात, मात्र परिस्थिती जैसे थे आहे. हजारो गावांना आजही पाण्याची नितांत आवश्यकता असून पाण्याशी निगडित महिलांच्या आरोग्याचे, शिक्षणाचे आणि सबंध आयुष्याचे प्रश्न फक्त एका पाण्याच्या नळाने सुटू शकतात, असंही त्या म्हणाल्या.