Nashik News : साप हा शब्द नुसता कानावर पडला, तरी मनात धस्स होतं, आणि जर का साप सभोवताली दिसला तरी आपली भीतीने गाळण उडते. मात्र नाशिक (Nashik) शहरातील कामटवाडे परिसरातील एका अपार्टमेंटच्या तळमजल्यात अतिविषारी सर्प प्रजाती असलेल्या घोणसची (Russel Viper) 24 पिल्लांचा घोळका असल्याचे समोर आले. त्यानंतर अपार्टमेंटमध्ये एकच खळबळ उडाली, मात्र सर्पमित्रांनी रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. 


पावसाळा (Rainy) तोंडावर आला असून आता साप दिसण्याचे प्रमाण वाढत जाते. अनेकदा अडगळीच्या ठिकाणी हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. नाशिकच्या (Nashik) कामतवाडे परिसरातील विखे-पाटील शाळेजवळील अत्रीनंदन अपार्टमेंटमध्ये ही घटना समोर आली आहे. या ठिकाणच्या तळमजल्यात एका रहिवाशाला सापाचे पिल्लू आढळून आले. त्यांनतर त्याने ही माहिती अपार्टमेंटच्या रहिवाशांनी सांगितली. रहिवाशांनी तात्काळ वन्यजीव संरक्षण संस्थेसह सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तात्काळ मादीसह पिल्लांना सुरक्षितपणे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.


दरम्यान सिडको (Cidco) परिसरातील कामटवाडे परिसरातील एका अपार्टमेंटच्या तळमजल्यात हा प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या सुमारास येथील रहिवाशाला सापाचे एक पिल्लू आढळून आले. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर तात्काळ सदस्य दीपक महाजन, जयेश धाव घेत अपार्टमेंटमध्ये पाहणी केली. तब्बल दीड ते दोन तासांच्या शोधमोहीमेनंतर एका ठिकाणी मादी ही एकापेक्षा जास्त पिल्लांसह आढळून आली. पाच-दहा नव्हे तर तब्बल 24 पिल्ले आढळून आल्याचे समजताच अपार्टमेंटमधील रहिवाशांची झोप उडाली. 


मादीसह 24 पिल्ले रेस्क्यू 


दरम्यान सर्पमित्रांनी सुरक्षितरीत्या मादीसह 24 नवजात पिल्लांना रेस्क्यू करत त्वरित वनविभागाला माहिती कळविली. दिवस उजाडताच घोणस सर्प व पिल्लांना शहरी भागातील लोकवस्तीपासून लांब नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. एका विषारी सर्प प्रजातीच्या मादीने अशा प्रकारे अपार्टमेंटमध्ये पिल्लांना जन्म देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने अपार्टमेंट किंवा एखाद्या घराच्या अंगणातून सर्पांच्या पिल्लांना रेस्क्यू करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. भारतात सर्वाधिक मानवी मृत्यू घोणसच्या दंशाने होतात, असे पाटील यांनी सांगितले.


नाशिक वन्यजीव विभागाकडून आवाहन 


ऊन हळूहळू कमी होऊन पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आपल्या आजूबाजूला लोकवस्तीमध्ये साप दिसण्याचे प्रमाण वाढते. महत्वाचे म्हणजे हा कालावधी घोणस सर्पाच्या पिल्लांच्या जन्माचा कालावधी मानला जातो. यामुळे यामुळे सतर्कता बाळगावी. कुठल्याही प्रकारचा साप दिसल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ वनविभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती कळवावी, असे आवाहन नाशिक वनविभागाकडून करण्यात आले आहे.