Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धडक कारवाया सुरु आहेत. लहान कर्मचाऱ्यापासून ते बड्या अधिकाऱ्यांपर्यत ही धडक मोहीम सुरु आहे. अशातच गुरुवारी कामगार उपायुक्तालयातील दुकाने निरीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्यास लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. मात्र अटकेच्या आदल्या दिवशी या महिला अधिकाऱ्याने धडक मोहीम सुरु असताना एका हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत फिर्यादी म्हणून कामही पहिले. त्यामुळे पहिल्या प्रकरणात तडजोड न झाल्याने गुन्हा दाखल झाला, तर दुसऱ्या प्रकरणात तडजोड झाली, मात्र ती स्वतःवरच बेतल्याची चर्चा आहे. 


सध्या लाचलुचपत विभाग (ACB) अगदी फॉर्मात असून रोजच धडक कारवाया होत आहेत, मात्र अधिकारी वर्गाला काहीच फिकीर नाही. राजरोसपणे लाच घेण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच लाच प्रकरणात एक ट्विस्ट समोर आला आहे. नाशिक (Nashik) शहरात बालकामगार विरोधी मोहीम राबविली जात असताना कामगार उपायुक्तालयातील दुकाने निरीक्षक निशा बाळासाहेब आढाव यांना बाल कामगाराविरोधी शोषणाचा गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडले आहे. मात्र दुसरीकडे याच महिला अधिकाऱ्याने या प्रकरणा आधी ही धडक मोहीम सुरु असताना हॉटेल चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक हॉटेल व्यावसायिक शहरात चालवीत असलेल्या हॉटेलमध्ये बालकामगार नोकरीस असल्याची बतावणी करून या प्रकरणात आढाव यांनी केलेल्या तपासणी दरम्यान निरंक अहवाल पाठवून बाल कामगार असल्यासंदर्भात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल व्यावसायिकाकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचासमक्ष पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून कामगार उपायुक्त कार्यालयात पंच साक्षीदार समक्ष लाच स्वीकारताना सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पथक पोलिस नाईक मनोज पाटील, अजय गरुड, शितल सूर्यवंशी यांनी रंगेहाथ पकडले. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय आहे नेमक प्रकरण? 


तर या आधीच्या प्रकरणात निशा आढाव या स्वतः फिर्यादी असून त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शहरात बालकामगार विरोधी धडक मोहीम सुरु असताना इंदिरानगर परिसरात एका हॉटेलात कारवाई केली. या ठिकाणी एक बालकामगार आढळून आला. त्यानुसार दुकाने निरीक्षक असलेल्या निशा आढाव यांनी संबंधित हॉटेल चालकाची फिर्याद दाखल करत इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारचा गुन्हा न दाखल करण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना आढाव यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वीही बालकामगार विरोधी कारवाई करत असताना अशा प्राकाराची तडजोड झाली नसेल का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.