Nashik trimbakeshwer News : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहरात शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने सुरु केलेली गावजेवणाची परंपरा अद्याप सुरु आहे. परंतु, विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची आणि जेवणासाठी वेगळ्या पंगतीची परंपरा अंनिसने घेतलेल्या आक्षेपामुळे बंद करण्यात आली. शिवाय यावर्षीच सर्व समाजातील व्यक्तींनी एकाच पंगतीत बसून प्रसादाचा लाभ घेतला.
नाशिक (Nashik) शहराजवळील त्र्यंबकेश्वर हे धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. आजही या शहरात अनेक ऐतिहासिक परंपरा जपल्या जातात. याच प्रमाणे येथील महादेवी ट्रस्टच्या माध्यमातून गावजेवण देण्याची परंपरा आजही कायम आहे. यात हजारो लोक सहभागी होऊन गावजेवण करतात. मात्र या ठिकाणी एका विशिष्ट समाजाला वेगळे आणि इतरांना वेगळे जेवण देत असल्याचे अंनिसने (Andhshradha Nirmulan Samiti) समोर आणले होते. मात्र हा दावा खोटा असल्याचे सांगत महादेवी ट्रस्टने (Trimbakeshwer Mahadevi Trust) असं कोणतेही वेगळेपण नसल्याचे सांगितले होते. मात्र यंदापासून असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वच स्तरावरील नागरिकांनी एकत्र येत गावजेवणचा आस्वाद घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
त्र्यंबकेश्वरच्या महादेवी ट्रस्टकडून अनेक वर्षापासून गावजेवणाचे आयाेजन हाेते. यात 10 हजार लोक महाप्रसाद घेतात. एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच वेगळे शिजवले जाते. ही पंगत वेगळी बसते, असे महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांना समजले हाेते. लोकांच्या इच्छेने गावजेवण होत असेल तर सर्व गावकरी एकाच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंगतीत वाटप होत असलेल्या अन्नाचा लाभ घेतील, ही भूमिका अंनिसने घेतली. तशा आशयाचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना देत पंगतीभेदाबाबत चर्चा केली.
एकाच ठिकाणी बसून भोजनाचा आनंद घ्यावा...
गावजेवणात एका विशिष्ट समाजासाठी वेगळ्या ठिकाणी अन्न शिजवून वेगळी पंगत बसवणे ही प्रथा अनिष्ट, अमानवीय, सामाजिक विषमतेला बळ देणारी आहे, असे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, डॉ. सुदेश घोडेराव, अॅड. समीर शिंदे, संजय हरळे यांनी सांगितले. तहसीलदारांनी संबंधित ट्रस्टींना बोलावून घेत समज दिली. पोलीसप्रमुखांनीही कायद्याचे पालन करुन एकोप्याने राहून सर्वांनी एकाच पंगतीत भोजनाचा आनंद घ्यावा या अंनिसच्या विचाराला पाठिंबा दिला. त्यानंतर ट्रस्टींनीही योग्य तो निर्णय घेऊन सर्वांनी एकाच पंगतीत भोजन घेण्यासाठी सर्वांना आवाहन केले. त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसण्याची प्रथा सर्वांच्या प्रयत्नातून संपुष्टात आली.
गावजेवण पंगतीची परंपरा काय?
त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टमार्फत दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात जेवणावळीचे आयोजन केले जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सामाजिक स्तरातील सर्वच लोक जेवणासाठी येत असतात. मात्र पंगत बसवताना भेदभाव केला जात असल्याचा आणि एका विशिष्ट जातीचे लोक तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजवले जाते. त्यांची जेवणाची पंगत सुद्धा इतर समाज घटकांपासून वेगळी बसवली जाते असा आरोप अंनिसच्या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र यंदापासून ही प्रथा मोडीत काढत सर्वांना समान व्यवस्था असणार असल्याचे आयोजक मंडळाकडून सांगण्यात आले. त्यानुसार सर्वानी एकत्र येत गावजेवण केले.