अहमदनगर:  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election)  निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून अहमदनगर जिल्ह्यातील आजी माजी महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात दोन्ही नेत्यांनी एकमेकविरोधात पॅनल उभे केल्याने पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अपक्ष आमदार सत्यजीत तांबे सहभागी झाले असून त्यांनी नाव न घेता पदवीधर निवडणुकीत उघड मदत करणाऱ्या विखेंवर टीका केली आहे. 


अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि संगमनेर हे आजी व माजी महसूलमंत्र्यांचे मतदारसंघ आहेत. दोन्ही तालुके एकमेकांच्या शेजारी मात्र आजपर्यंत या दोन्ही नेत्यांचे कधी जुळले नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून संगमनेर मध्ये विखेंच्या नेतृत्वात तर राहत्यात थोरात यांच्या नेतृत्वात पॅनल एकमेकांच्या विरोधात पॅनल उभे करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाची प्रचार शुभारंभ सभा संपन्न झाली. यावेळी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे देखील मामांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचे दिसून आलं. यावेळी मामा भाच्याने विखेंवर टीका करत हे दहशतीचे वातावरण आपल्या तालुक्यात येऊ द्यायच नाही असे आवाहन केले आहे.


बाळासाहेब थोरात यांना ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते पुढच्या निवडणुकीत त्यांच्या बरोबर दिसले हा इतिहास आहे. पलीकडून एक विमान निघालेल आहे. त्याला ना पायलट ना त्यांच्यात इंधन अशी अवस्था... ते विमान कुठं तरी धडकल्याशिवाय राहणार नाही, फक्त ते आपल्या तालुक्यात धडकून आपलं नुकसान होणार नाही, यासाठी आहे तसे विमान परत पाठवण्याच काम आपल्याला करायचं आहे अशी टीका अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी विखेंच नाव घेता केली आहे.  विशेष म्हणजे नाशिक पदवीधर निवडणुकीत विखे यांनी उघडपणे सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर प्रथमच सत्यजीत तांबे यांनी टीका केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 


माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाषणातून टीका करताना विखेना अनेक टोले लगावले आहेत. मी महसूलमंत्री होतो अनेक काम केली मात्र आता जे महसूलमंत्री झाले त्यांनी पहिली मिरवणूक संगमनेरला काढली आणि घोषणा दिली "हम से जो टकरायेगा मिटी मे मिल जायेगा", तेव्हापासून केवळ जिरवाजिरवीचे काम सुरू केले आहे. आम्ही असं काय केलं की हा त्रास दिला जातोय असा सवाल थोरात यांनी केला. तसेत डॉ सुधीर तांबे यांना सुद्धा अनेकदा खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आल्याचा आरोप केला आहे.


 खातं मी सुद्धा सांभाळलं, खूप संधी असते कामं करायला मात्र असा लोकांचा छळ करण्यात काय अर्थ.. हे दहशतीचे वातावरण आपल्याला इकडे येऊ द्यायचं नाही उलट राहाता तालुक्यातील वातावरण दुरुस्त करण्याची जबाबदारी आपली आहे असं काम आता आपल्याला करायचं आहे. निवडणुकीच मतदान केंद्र अशा ठिकाणी शोधलं की ते लवकर सापडणार नाही. किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा आहेत का नाही? आपण ही मंत्री होतो असे उद्योग केले का असा थेट सवाल थोरात यांनी केला आहे.