Sanjay Raut Complaint to CBI: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात (Bhima Patas Sugar Factory) राऊतांनी सीबीआयकडे (CBI) तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यानं आपण सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तसेच, या कारखान्यात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भीमा पाटस कारखाना भाजप (BJP) आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या मालकीचा आहे.
सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत संजय राऊतांनी अनेक आरोप केले आहेत. भीमा पाटस साखर कारखान्यात मनी लॉन्ड्रिंग झालाच्या आरोप संजय राऊतांनी केला आहे. कारखान्याच्या खात्यात असलेले 500 कोटी रुपये कारखान्या व्यतिरिक्त बाहेरच्या कामांसाठी, खासगी कामांसाठी वापरल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही संजय राऊतांनी सीबीआयकडे केली आहे. संजय राऊतांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलतानाही भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात आरोप केले होते. तसेच, यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र गृहमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सीबीआयकडे तक्रार दाखल केल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे. संजय राऊतांनी त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती सीबीआयला पुरवली असून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यानं CBI कडे तक्रार : संजय राऊत
दौंडचा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि दादा भुसेंचा गिरणा सहकारी साखर कारखान्याचे 1800 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आहे. यावर सरकार कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून मी राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याचं (Bhima Patas Sugar Factory) प्रकरण CBI कडे पाठवले आहे. मी वारंवार गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे या कारखान्याबाबत पत्रव्यवहार केला होता. पण त्यांनी याबाबत दुर्लक्ष केल्याचे राऊत म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयला मी पूर्ण सूट दिली असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं, म्हणून हे प्रकरण मी सीबीआयकडे पाठवले आहेत. सध्या राज्याचे गृहमंत्री याकडं लक्ष देत नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
माझ्याकडे 17 कारखान्याचे कागदपत्रे : संजय राऊत
भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन राहुल कुल आहेत. माझ्याकडे 17 कारखान्याचे कागदपत्रे आहेत. त्यापैकी राहुल कुल यांचा एक कारखाना आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते सदानंद कदम यांना अटक केली आहे. राजकीय विरोधकांच्या मागे तपास यंत्रणा लावल्या आहेत. भीमा सहकारी प्रकरण किरीट सोमय्यांकडे चारवेळा पाठवले. त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आहे. पण सोमय्या म्हणतात शिवसेना राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसबद्दल प्रकरणे घेऊन या, तरच मी हात लावतो. राहुल कुल हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत का नाही मला माहिती नाही. मी काही त्याची माहिती घेतली नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले.