Nashik News :  नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली. विहिरीचे खोदकाम करताना बार (Well Firing) उडविण्यात आला. यावेळी तिघेही कामगार विहिरीत असल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे. 


नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी (Hiradi Village) गावात ही घटना घडली आहे. या गावात ग्रामपंचायत विहिरीचे खोदकाम सुरू असून विहिरीत बार उडविण्याचे काम सुरु होते. या कामासाठी तीन कामगार कार्यरत होते. सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक विहिरीला लावलेला बरच भीषण स्फोट झाला. या स्फोटात तिन्ही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील दोन कामगार बाहेर फेकले गेले तर अन्य एक जण विहिरीत दबून गेला. रात्री उशिरा त्याला बाहेर काढण्यात आले. 


दरम्यान तिन्ही मयत कामगार हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असून लहू जालिंदर महाजन, आबा उर्फ पिनू एकनाथ बोराडे, बिविषण शामराव जगताप अशी तिन्ही कामगारांची नावे आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील शेल्याची विहीर असून विहिर खोल करण्याचे काम सुरु होते. यासाठी बार लावण्यात येऊन स्फोट घडविले जात होते. मात्र काल रात्रीच्या सुमारास बार लावत असताना अचानक लावलेल्या बारचा स्फोट झाला आणि यात तिन्ही कामगारांचा मृत्यू झाला आहे. यात दोघे कामगार स्फोटाने बाहेर फेकले गेले तर रक कामगार विहिरीत पडून मृत्यूमुखी पडला आहे.  


घटना घडल्यानंतर तात्काळ हरसूल पोलीस स्टेशनचे पीआय बोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत कामगारांना तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. तर सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून प्राथमिक तपास करण्याचे काम सुरु आहे.