Nashik Railway Incident : नाशिक (Nashik) जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली असून लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन (टॉवर) चुकीच्या दिशेने आल्याने तब्बल चार रेल्वे कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. लासलगाव (Lasalgoan) रेल्वे स्थानकाजवळील कोटमगाव शिवारात ही घटना घडली आहे. 


नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे लाईन कोटमगाव शिवारात सोमवारी (13 फेब्रुवारी) पहाटे पावणे सहाच्या हा अपघात (Railway accident) घडला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या वेळी चार लाईनमॅन काम करत असताना अचानक लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन चुकीच्या बाजूने म्हणजेच लासलगाव बाजूने निफाडकडे जात असताना हा अपघात झाला. या मार्गावर पोल नंबर 15 ते 17 दरम्यान ट्रॅक मेंटन करण्याचे काम सुरु असताना चार मेंटेनन्स कर्मचाऱ्यांना रेल्वे लाईनचे मेंटनेस करणाऱ्या टॅावरने धडक दिली. यात कर्मचाऱ्यांना जबर मार लागल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.


चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश


या अपघातात संतोष भाऊराव केदारे, दिनेश सहादु दराडे, कृष्णा आत्माराम अहिरे, संतोष सुखदेव शिरसाठ अशी मयत झालेल्या चौघां कामगारांची नावे आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांनी या चौघांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील पाटील यांनी तपासणी करुन या चारही रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेनंतर चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी जोरदार आक्रोश केला. घटना समजतात लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस  उपनिरीक्षक गवळी, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुळे, लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली.


रेल्वे कर्मचाऱ्यांचं रुळावर उतरुन आंदोलन, नागरिकांचाही संताप


लासलगाव येथील रेल्वे अपघात घटनेनंतर स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन केले. घटनेनंतर नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत टॉवर इंजिन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली. 


गोदावरी एक्सप्रेस रोखली...


त्याचबरोबर नऊ वाजून 28 मिनिटांनी मुंबईकडे जाणारी गोदावरी एक्सप्रेस देखील दहा मिनिटे रोखण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासन मुर्दाबाद, ट्रॅकमन एकता जिंदाबाद अशा घोषणा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या. त्याचबरोबर दुर्घटना घडून तीन तास उलटले असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्यापही घटनास्थळी पाहणी केली नसल्याने नागरिकांकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान या घटनेमुळे मध्य रेल्वे मार्गावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भल्या पहाटे घडलेल्या अशा दुर्दैवी घटनेमुळे लासलगाव शहर हळहळले आहे तर रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.