Mumbra Railway Accident: मुंब्र्यात एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. येथील पारसिक बोगद्याजवळ एक झाड रेल्वे ट्रॅकवर कोसळं होतं. ट्रॅकवर पडलेले झाड पाहून लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला, ज्यामुळे मोठा रेल्वे अपघात टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याच मार्गाने एक एक्सप्रेस येत होती. जी भागलपूरहून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येत होती. ही ट्रेन पारसिक बोगद्याजवळ जिथे फास्ट ट्रॅक आहे, त्या ठिकाणाहून जाणार होती. या ट्रेनचा वेगही अधिक होता. अशातच याच बोगद्याजवळ रेल्वे ट्रॅकवर एक झाड पडले होते. ज्यावेळी ही रेल्वे त्याच ट्रॅकने पुढे येत होती. त्यावेळी ही ट्रेन चालवत असलेल्या लोको पायलटला या ट्रॅकवर झाड पडल्याचं दिसलं. ट्रॅकवर झाड पडल्याचं दिसताच ट्रेनमधील पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला. ब्रेक लावूनही या झाडावरून दोन ते तीन डब्बे पुढे गेले. मात्र सुदैवाने इतक्या मोठ्या अपघातानंतरही रेल्वे रुळावरून या ट्रेनचे डब्बे घसरले नाही. 

या अपघातानंतरही रेल्वेमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं समजतं आहे. तसेच कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. अशातच रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅकवरील नियमित पेट्रोलिंग होतं नसल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे पुढे अशी घटना घडल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, रेल्वे ट्रॅकवरून झाड हटवण्याचे काम रेल्वे कर्मचारी करत आहेत.

इतर महत्वाची बातमी: