Aurangabad News: औरंगाबादकरांचे (Aurangabad) लक्ष लागलेल्या हर्सूल येथील मुख्य रस्त्यावरील बांधकाम काढण्याच्या कारवाईला आजपासून सुरुवात होणार आहे. शहराच्या उत्तर दिशेला असलेल्या हर्सूलच्या अरुंद रस्त्यामुळे अडीच दशकांपासून निर्माण होणारी वाहतूक कोंडी अखेर दूर होणार आहे. येथील रस्ता रुंदीकरणा आड येणाऱ्या 98 मालमत्तांच्या भूसंपादन प्रक्रियेला आज सुरुवात होत आहे. या सर्व मालमत्तांचे बाधित क्षेत्र पाडून लागतीच रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे तब्बल अडीच दशकानंतर हा मार्ग मोकळा श्वास घेणार आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद शहराचा उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणून समजल्या जाणाऱ्या हर्सूल गावातून जाणारा मुख्य रस्ता गेल्या अडीच दशकांपासून मोकळा श्वास घेण्याच्या प्रतीक्षेत होता. त्यासाठी यापूर्वी 2008 आणि 2012 साली महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तरित्या मोजणी करुन भूसंपादन प्रक्रिया केली होती. मात्र भूसंपादनाचा मोबदला द्यायचा कोणी यावर निर्णय न झाल्याने रुंदीकरण रखडले होते. मात्र अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) 2017 साली हर्सूल ते फदार्पूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफच्या कामाला सुरुवात केल्याने आणि या मार्गावरील सर्व मालमत्तांच्या भूसंपादनाची जबाबदारी घेतल्याने हर्सल रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात होत आहे.
प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल...
हर्सूल येथील मुख्य रस्त्यावर असलेले बांधकाम काढून घेण्यासाठी प्रशासनाने भूखंडधारकांना 21 दिवसांचा वेळ दिला होता. तो वेळ रविवारी संपला असल्याने, आज बांधकाम पाडून रस्ता मोकळा करण्याची कारवाई केली जात आहे. यासाठी प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
पर्यायी रस्ता वापरावा...
13 ते 16 फेब्रुवारीदरम्यान हर्सूल गावात बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे हर्सूल मार्गे सावंगी-फुलंब्री- सिल्लोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा रस्ता या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेश मयेकर यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत. औरंगाबादमधून फुलंब्री, सिल्लोडकडे जाणारी वाहतूक हर्सूल टी पॉइंटवरुन वळवून आंबेडकरनगर चौक-पिसादेवी बायपास मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच, फुलंब्री-सिल्लोडकडून हर्सूल गावात येणारी वाहतूक सावंगी नाका इथून सावंगी बायपास मार्गे नारेगाव-वोखार्ड टी पॉईंट अशी वळवली आहे. तसेच गरजेनुसार बदल केले जातील, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: