Manmad Panewadi : मनमाडपासून (Manmad) जवळ असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून (Panewadi Petrol Project) पेट्रोल डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी आज (26 जून) सकाळपासून संप सुरू केला आहे. या संपामुळे प्रकल्पातून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पंपावर केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धार टँकर चालक-मालकांनी केला आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड (Manmad) शहराजवळ भारत पेट्रोलियम कंपनीचा पानेवाडी प्रकल्प असून या प्रकल्पातून अनेक जिल्ह्यांना पेट्रोल-डिझेल चा पुरवठा केला जातो. मात्र काल उशिरा रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरच्या काचा फोडून चालकाला मारहाण केल्याचा आरोप टँकर चालकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पानेवाडी येथे एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑईल आणि गॅस प्लांटमधील टँकर चालक (Petrol tanker) आणि वाहतूक दारांनी संप पुकारला आहे. या प्रकल्पातून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पाच-सहा जिल्ह्यांना होणारा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रकल्पातून इंधन आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे टँकर, ट्रक चालक, मालक आणि ट्रान्सपोर्टर यांनी काम बंद आंदोलन (Protest) सुरु केलं आहे. 


नाशिकच्या मनमाडजवळील नागापूर आणि पानेवाडी इंधन प्रकल्पातून इंधन भरुन निघालेले टँकर रस्त्यावर उभे करण्याच्या वादातून टँकरच्या काचा फोडण्यात आल्या. त्याचबरोबर सदर टँकर चालकाला मारहाण केल्याचा आरोप करत तीन तेल कंपन्या आणि गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूकदार आणि चालकांनी इंधन वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वांनी कंपनीच्या गेटसमोर येऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आल्याने तिढा वाढला आहे. या संपात प्रकल्पातून इंधन आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे टँकर, ट्रक चालक, मालक आणि ट्रान्सपोर्टर सहभागी झाले आहे.


नांदगाव मनमाड मार्गावर वाहतूक कोंडी? 


मनमाडच्या पानेवाडी येथील इंधन कंपनीचे इंधन टँकर मनमाड नांदगाव मार्गावर सर्रास उभे केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नांदगाव या महामार्गाचे नव्याने चौपदरीकरण झाल्याने सदर मार्ग आता रुंद झाला आहे. मात्र याच मार्गावर असलेल्या पानेवाडी प्रकल्पाच्या परिसरात इंधन कंपनीचे टँकर या मार्गावर कडेला उभे केले जात असल्याने गावकऱ्यांकडून नेहमीच तक्रार केली जाते. अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जाऊन अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे इंधन टँकर रस्त्यात उभे न करता योग्य ती पार्किंग करावी, अन्यथा रस्त्यावर इंधन टँकर हे करु नयेत, असेही या मार्गावरुन जाणारे वाहनधारकांचे म्हणणे आहे. याच प्रकरणातून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.