World Anti Drug Day 2023: आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन... सध्याच्या काळात प्रत्येकानंच आपापल्या मुलांची काळजी घेणं गरजेचं बनलं आहे. सध्या अनेक अल्पवयीन मुलंसुद्धा अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बुलढाण्यातही अनेक अल्पवयीन मुलं सर्रास अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं समोर आलं आहे. 


बुलढाण्यात अनेक प्रकारचे अंमली पदार्थ  गांजा, गुटखा सर्वदूर पोहचले असताना आता तरुणाईचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा व्यसनाचा भयंकर प्रकार समोर आला आहे. नशा भागवण्यासाठी चक्क फेविक्विक, बॉंड आणि स्टीकफास्ट यांचा सर्रास वापर केला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल आहे. जिल्ह्यातील तरुणांसह अल्पवयीन मुलंसुद्धा या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. विशेषत: मध्यप्रदेशातील काही कामगार मेहकरमध्ये काम करण्यासाठी येतात, त्यांची मुलं गावामध्ये फिरून पैसे मागून व्यसनं करतात. त्यामुळे आपला पाल्य कुठल्या नशेच्या आहारी तर गेला नाही ना? याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


गांजा, दारू, गुटखा हे नशेचे प्रकार असले तरी त्यांची मेहकर तालुक्यात व्हाईटनर, बॉण्ड, फेविक्वीक यांची नशा तरुण वर्गाकडून केली जात असल्याचं हादरवणारं वास्तव आहे. ग्रामीण भागात अनेक शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी हे आगळ्या वेगळ्या नशेच्या गर्तेत सापडले आहेत. मेहकर शहरांमधील शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी जे पाहतात तेच अंगीकृत आणण्याचा काही विद्यार्थी प्रयत्न करतात. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना रस्त्यामध्ये दारूचे दुकान आहे, त्या दारूच्या दुकानाच्या परिसरामध्ये उघड्यावर दारू पिणं, रस्त्यावर बसून दारू पिऊन कोणी कुठे पडलेलं आहे, अशा प्रकारचं चित्र मेहकर वासियांसाठी नवीन नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या मनावर याचा परिणाम नक्कीच होतो. याकडे पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. 




व्हाईटनर, बॉण्ड, फेविक्वीक हे प्लास्टीक थैलीत टाकून, ते हातानं घासून त्याचा फुगा केला जातो आणि तो फुगा तोंडाला लावून जोरात आत पोटात श्वास घेतला जातो. या श्वासाद्वारे नशा मिळत असल्याचा अनुभव येतो. विशेष म्हणजे, गांजा आणि अन्य तत्सम नशाकारक वस्तू महाग असल्यानं अनेक गरीब तरुणांना घेणं परवडत नाही. पण पाच दहा रूपयाला मिळणारं व्हाईटनर, बॉण्ड, फेविक्वीक विकत घेतलं की, नशा करणं त्यांना सहज शक्य होतं. या नशेचा अंमल तरूणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.


विशेष म्हणजे, नशेचा हा प्रकार शहरात आला कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणाहून मजूर काम करण्याकरता महाराष्ट्रामध्ये येतात. त्यांची मुलं ते स्वतः अशा प्रकारचे नशा करताना दिसून येतात. अनेक तरूण या जीवघेण्या नशेच्या आहारी गेले असून वारंवार या प्रकारची नशा करत असल्यानं ते वेगळ्याच जगात वावरत असल्याचं दिसून येतं. परराज्यातील तरुण हे शहरात किराणा दुकान, जनरल स्टोअर्समधून फेविक्वीक, बॉण्ड आणि व्हाईटनर विक्रीसाठी असल्यानं कोठेही नशा करतात. जिल्ह्यातील तरुणांना या व्यसनापासून दूर ठेवायचे असतील तर यावर प्रशासनाला कठोर निर्बंध घालावे लागतील. 


स्टिकफास्ट, फेविकॉल, व्हाईटनर, नेलपेंट, पेट्रोल, अशा अनेक प्रकारच्या वस्तूंपासून व्यसन करून नशा करणाऱ्या अठरा वर्षाच्या आतील मुलांचं आरोग्य धोक्यात आहे. या व्यसनामुळे हृदय बंद पडणं, पॅरॅलिसिस होणं, भुरळ येणं, चक्कर येणं किंवा नशा जास्त झाल्यानं त्यात मृत्यूसुद्धा होऊ शकतो. एवढा गंभीर हा प्रकार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.   


खरं तर तरुणाई आपल्या देशाची संपत्ती आहे. पण या संपत्तीलाच आता कीड लागण्याचा प्रकार घडत आहेत. गरीब घरचा मुलगा असो की, मध्यमवर्गीय वा सधन वर्गातील काही तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला दिसत आहे. व्यसन हे तरुणाईचं स्टाईल स्टेटमेंट बनलं आहे. मात्र तेच व्यसन त्याच्या आयुष्यात अंधार करणारं ठरत आहे.