Maharashtra Mansoon Update : मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील 48 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर वाढणार
सोमवारी पहाटेपासून राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अखेर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विकेंडच्या दिवशी पाऊस झाल्याने मुंबईकरांनी पावसाचा मनसोक्त आनंदही घेतला. विविध जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजाही सुखावला आहे.
पुढील 48 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीपर्यंत पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचलं आहे.
वसई, विरार, मीरा भाईंदरमध्ये पावसाची संततधार
मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळं हवामान विभाग मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. वसई, विरार आणि मीरा भाईंदर शहरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. ढगाळ वातावरण असून, वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये अधून मधून पावसाची रिपरिप सुरु आहे.
घाटकोपरमध्ये इमारत कोसळून दोघांचा मृत्यू
काही ठिकाणी इमारती कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रविवारी घाटकोपरमध्ये इमारत कोसळून दुर्घटना घडली यामध्ये दोन जण जखमी झाले होते. या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वसईमध्येही शनिवारी इमारतीचा सज्जा कोसळला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे 11 झाडे उन्मळून पडली आहेत. तर, पावसादरम्यान शॉर्ट सर्किटच्या सात घटनांची नोंद झाली आहे.
गोवंडीत दोन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू
मुंबई उपनगरातील गोवंडीमध्ये तुंबलेल्या नाल्या साफ करताना दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. हे सफाई कर्मचारी चुकून एका मॅनहोलमध्ये पडले. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना तातडीने वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्या दोन कामगारांना वाचवता आलं नाही. त्या दोन सफाई कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं
मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. काही भागांतील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कुलाबा वेधशाळेने रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत 86 मिमी पावसाची नोंद केली, तर उपनगरातील प्रतिनिधी सांताक्रूझ हवामान केंद्राने याच कालावधीत 176.1 मिमी पावसाची नोंद केली, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.