Nashik News : विवाह सोहळ्याआधी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Photo) ही आजकाल फॅशन झाली आहे. कुणीही लग्नापूर्वी (Wedding Ceremony) प्री वेडिंग शूट झालेच पाहिजे, हे प्री वेडिंग फोटोशूट केल्याशिवाय जणू लग्नच पूर्ण होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेटवर, तुम्ही अनेकदा जंगलात, समुद्र काठी, कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूट केले जाते. मात्र एका बहाद्दराने चक्क नाशिकच्या (Nashik) जिल्हाधिकारी कार्यालयात प्री वेडिंग केल्याचा प्रकार घडला आहे. 


सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू झाली आहे. त्यामध्येच प्री वेडींग फोटोशूट हा विषय सध्या चर्चेत आहे. आपलेही सेलिब्रिटींप्रमाणे फोटोशूट व्हावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, ही इच्छा लग्नसमारंभामध्ये पूर्ण केली जाते. त्यातही प्री वेडिंग फोटोशूट हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये लग्नाच्या काही दिवस आधी वेगवेगळ्या थीम ठरवून शूट केले जाते. त्यामुळे लोकेशन खूप महत्वाचे असते. लोकेशनमुळे फोटोशूट चांगले होते. मग अनेकदा मंदिर, पुरातन वास्तू, कुठे नदीकिनारी ही मंडळी कपलसह फोटो शूट करत असतात. मात्र एका पठ्ठ्याने चक्क नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) फोटो शूट केल्याने गोंधळ उडाला. 


नाशिकमधील एका नवविवाहीत जोडप्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतीतच 'फोटोशूट' करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी कार्यालयीन कामकाजाची वेळ असल्याने कार्यालयात रेलचेल होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. अलिकडच्या काळात प्री वेडींग शुटींग ही संकल्पना तरूणाईमध्ये चांगलीच रुजत चालली आहे. प्री-वेडिंग शूटसाठी आलेल्या जोडप्यांची मागणी अफाट असते. एक तर अशा शूटसाठी दिवसभरात सकाळ किंवा संध्याकाळ या दोनच वेळा चांगल्या असतात. मग दोन-तीन तास नुसते शुटिंग होते आणि असे पुन्हा त्यांच्या गरजांनुसार दोन ते तीन दिवस शूट चालते. असच एक जोडपं कलेक्टर ऑफिसमध्ये फोटो शुटींग करत असतांना कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडले.


नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयांच्या आवारातच विवाह नोंदणी कार्यालय आहे. नववविवाहीत जोडपे येथे विवाहाची नोंदणी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे चित्र नेहमी पाहायला मिळते. परंतू या जोडप्याने अगदी कार्यालय परिसरात तासभर फोटो शुट केल्याने कर्मचारी वर्गाचेही लक्ष वेधले गेले. विशेष म्हणजे विनापरवानगी हा प्रकार घडत असतांना त्यांना कुणी त्यांना जाबही विचारला नाही. याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना हा प्रकार समजताच त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय पुन्हा असे प्रकार घडू नयेत याकरिता दुय्यम उपनिबंधकांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. कार्यालयाच्या आवारात वर्तन कसे हवे याचे मार्गदर्शन करणाऱ्या सूचना विवाह नोंदणी कार्यालयात व बाहेर लावाव्यात असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.