Aurangabad Water Issue: गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान यासाठी आता नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यातच आता नव्याने टाकण्यात येणाऱ्या 900 मिमी व्यासाच्या नवीन पाईपलाईनसाठी जागाच शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही पाईपलाईन टाकायची कुठे असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमोर उभा राहिला आहे. 


औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान आधीच 700 मिमी आणि 1200 मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकलेल्या आहेत. परंतु या दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्याने आता राज्य सरकारने 1680 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. सध्या या योजनेचे काम सुरु आहे, परंतु ही योजना पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शहराला तातडीने दिलासा देण्यासाठी जुन्या पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 193 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला असून, त्यातून जुन्या योजनेसाठी 900 मिमी व्यासाचे नवीन पाईप टाकण्यात येणार आहेत.


पाईपलाईन टाकायची कुठे? 


दरम्यान शहराच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान 900 मिमी व्यासाची नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. मात्र, आता ही पाईपलाईन टाकायची कुठे असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमोर उभा राहिला आहे. कारण पैठण रोडलगत उपलब्ध जागेत आधीच्या दोन जलवाहिन्या आहेत. त्यात आता नवीन पाणीपुरवठा योजनेची 2500 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली जात आहे. या तीन जलवाहिन्या पडल्यानंतर आणखी एक जलवाहिनी टाकण्यासाठी तिथेच जागा उरत नसल्याचे चित्र आहे.


जागेचा प्रश्न निर्माण होणार 


नवीन योजनेची 2500 मिमी व्यासाची जलवाहिनी रस्त्याच्या ज्या बाजूने टाकली जात आहे, त्याच बाजूने आधीची सातशे आणि बाराशे मिमी व्यासाची जलवाहिनी आहे. त्यात आता नऊशे मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. मात्र, ही जलवाहिनी टाकताना जागा अपुरी असल्याने जीवन प्राधिकरणाला मोठी कसरत करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी सातशे आणि बाराशेच्या जलवाहिनीमध्ये जागाच शिल्लक नाही. तसेच रस्त्यावर या दोन्ही जलवाहिन्या तीन ठिकाणी क्रॉस झालेल्या असल्यामुळे नऊशेची पाईपलाईन टाकताना जमिनीची अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे नऊशे मीटरची पाईपलाईन टाकण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


रइतर महत्वाच्या बातम्या: 


औरंगाबाद स्मार्ट सिटीने विनानिविदाच साध्या अर्जावर दिले कोट्यवधीचे काम; माहिती अधिकारात बाब उघड