Nashik News : महाराष्ट्रात विविध भागात घडलेल्या महिला अत्याचार (Molestation) घटनांची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी दखल घेतली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांना (Police Mahasanchalak) त्यांनी लेखी निवेदन दिले असून या सर्व घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.


नाशिक (Nashik) जिल्ह्यात चांदवड तालुक्यात (Chandwad) एका विधवेला पतीच्या मृत्यूसंदर्भात माहिती विचारल्याने इतर महिलांनी तिची गावात चपलांचा हार घालून धिंड काढल्याची घटना घडली  आहे. महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का देणाऱ्या या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी भागातील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवून केलेला विनयभंगाचा प्रकार अतिशय गंभीर असल्याने या शिक्षकाला पोलिसांनी कठोर शिक्षा देण्यासाठी कारवाईची सूचनाही  त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 


मराठवाड्यात लातूर भागात एका शिक्षकाने वर्गात सर्वांसमोर अवमानकारक बोलल्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी असल्याने या शिक्षकांवर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. रायगड जिल्ह्यातही 29 जानेवारी रोजीच्या पनवेल भागात एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोघा अज्ञातांनी केलेला अत्याचार प्रकार निंदनीय असल्याने याही आरोपींना कठोर शिक्षा देण्याचा सूचना त्यांनी पोलिस महासंचालकांना दिल्या आहेत.


या सर्व घटनांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनांच्या माध्यमातून राज्यात महिलांसाठी असुरक्षित वातावरण तयार होत असल्याने याबाबत या सर्व घटनांच्या दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची आग्रही सूचना त्यांनी पोलीस महासंचालकाना केली आहे. या निवेदनातून त्यांनी राज्याच्या पोलीस दलाचे महिला अत्याचारांच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे.


महिलेची धिंड काढण्याचा प्रकार अंधश्रद्धेतुन?


चांदवड तालुक्यातील शिवरे या गावात एका विधवा महिलेचे तोंड काळे करून व चप्पलांचा हार घालून गावातून तिची धिंड काढण्यात आली. हा प्रकार अंधश्रद्धेतुन झाला असून जादुटोणा विरोधी कायद्याचे कलम लावण्याची महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. तशा मागणीचे निवेदन त्यांनी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना दिले आहे. शिवाय स्थानिक वडनेर भैरव येथील पोलीस आधिकाऱ्यांना पण तशी विनंती केली आहे. सदरचे कृत्य हे जादुटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, म्हणून त्या कायद्याचे कलम लावावेत, अशी विनंती डाॅ गोराणे व चांदगुडे यांनी केली आहे.