Saptshrungi Gad : लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील (Saptashrungi Gad) काही भाग धोकादायक झालेला असून येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सप्तश्रृंगी गडावर माळीण (Malin), इर्शाळवाडीसारखी (Irshalvadi) दुर्घटना होण्याची भीती स्थानिक ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) पत्र दिले आहे. 


संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी (Irshalvadi Land Slide) गावात घडली. येथील पन्नासहून अधिक घरांवर दरड कोसळल्याने जवळपास 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आजही सकाळपासूनच बचावकार्य सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचा (Nashik) सप्तशृंगी गड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सप्तशृंगी गडदेखील (Saptshrungi Devi) असाच भव्य कातळाच्या डोंगराच्या पायथ्याशी स्थित असून या ठिकाणी भलीमोठी वस्ती आहे. काही वर्षांपूर्वी घडलेल्या माळीण दुर्घटनेनंतर सप्तशृंगी गडाचा मुद्दा उपस्थित झाला होता, त्यावेळी देखील स्थानिक ग्रामपंचायतीने पत्र दिले होते. त्यानंतर इर्शाळवाडीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा सप्तशृंगी गड चर्चेत आला आहे.  


दरम्यान सप्तश्रृंगी गडावर माळीण सारखी दुर्घटना होण्याची भीती असून गडावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूला माती साचल्याने दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गडावरील पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी संपूर्ण गाव वसलेले असल्याने तात्काळ संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे. इर्शाळवाडीची घटना घडण्याच्याच दिवशी 19 जुलैला पत्र पाठवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर गडावर दरड कोसळण्याच्या संभाव्य घटनांच्या पार्श्वभूमीवर आज कळवण तहसील कार्यलयात बैठक होणार असून यासाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीचे पत्र 


सह्याद्री पर्वताच्या पूर्व- पश्‍चिम पर्वतरांगेत डोंगर पठारावर समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार 480 मीटर उंचीवर निसर्गसौंदर्य व भक्तिभावाने भारावलेला सप्तशृंगी गड (वणी) सात शिखरांचे (शृंगे) स्थान म्हणून ओळखले जाते. सप्तशृंग गड हे माळीण आणि आता इर्शाळवाडी येथील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर अति संवेदनशील धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून गणले जाऊ लागले. गडावर देवीचे मंदिर डोंगराच्या कपारीत असल्याने पावसाळ्यात डोंगर कपारीतील धोकादायक दरडी कोसळण्याची शक्‍यता असते. यामुळे काही महिन्यापूर्वी सरकारकडून आधुनिक पद्धतीने संरक्षित जाळी (गर्डर) बसवण्यात अली आहे. मात्र सद्यस्थिती मंदिर पायऱ्यांवरील राम टप्पा, कासव टप्पा व रोप वे मार्गाचा परिसर ते पहिल्या पायरीपर्यंतच्या भाग हा ठिसूळ दगड, मुरुमयुक्त असल्याने या भागातील माती पावसाळ्यात खाली वाहून येते. परिसरात खालच्या बाजूला सुमारे चार हजार लोकसंख्येची नागरी वस्ती आहे. धोकादायक भागातून पावसाळ्यात मुरुम मातीचा भाग खचून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


ईतर महत्वाच्या बातम्या : 


Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमध्ये माळीण आणि तळीये दरड दुर्घटनेची पुनरावृत्ती, काय घडले होतं माळीण आणि तळीयेमध्ये?