Nashik Saptshrungi Devi : एकीकडे सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शनासाठी (Saptshrungi Devi Mandir) ड्रेसकोड लागू करावा, अशा आशयाचा ठराव करण्यात आला आहे. मात्र सप्तशृंगी देवी ट्रस्टकडून याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ड्रेसकोडसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून मंदिर विश्वस्त, ग्रामस्थ, भाविकांशी चर्चा करून ड्रेसकोड (Dress code) लागू करावा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन सप्तशृंगी देवी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धपीठ अशी महती असलेल्या नाशिकच्या (Nashik) वणी सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याबाबत सप्तशृंगीगड ग्रामपंचायतीने सोमवारी मासिक बैठकीत ठराव केला आहे. या ठरावात महिलांनी तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात प्रवेश करू नये, मंदिरात पावित्र्य राखले जावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने (vani Grampanchayat) भाविकांना केले आहे. गुरुवारी हा ठराव मंदिर संस्थानकडे दिला जाणार आहे. ग्रामस्थासोबतच पुरोहित संघाने देखील ड्रेसकोड लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र सप्तशृंगी देवी मंदिर संस्थानकडून अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले आहे. 


सप्तशृंगी देवी संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे म्हणाले की, दरम्यान मंदिर संस्थानकडे ठराव येताच विश्वस्त आणि भाविकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असून सध्या कुठलाही ड्रेस कोड लागू करण्यात आला नसल्याचं ते म्हणाले आहेत. तर अनेक भाविकांनी ग्रामपंचायतीने ठरावाचे स्वागत केले आहे. त्यामुळे भाविकांनी गोंधळून न जाता सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी यावे, त्याचबरोबर अद्याप ड्रेसकोड संदर्भातील निर्णय घेतला नसल्याने स्थानिक ग्रामस्थ, विश्वस्त, भाविकांशी चर्चा करूनच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मत देवी संस्थानकडून सांगण्यात आले आहे. 


मंदिर प्रशासनाचे म्हणणं काय?


सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शनासाठी ड्रेसकोड संदर्भात कोणतीही नियमावली तयार करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत ग्रामपंचायतीने केलेला ठराव आहे, मात्र मंदिर प्रशासनाचा याबाबतचा निर्णय होणे बाकी आहे. त्यामुळे भाविकांनी निसंकोचपणे सप्तशृंगी देवी दर्शनासाठी गडावर यायचं आहे. सप्तशृंगी डावर येणाऱ्या भाविकांशी चर्चा करून ड्रेसकोड संदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी गोंधळून जाता भावभक्तीने दर्शनाला यायचं असल्याचे आवाहन सप्तशृंगी देवी मंदिराकडून करण्यात आले आहे. 


ग्रामपंचायतीचा ठरावात काय म्हटलंय? 


दरम्यान वणी ग्रामपंचायतीकडून (Vani Grampanchayat) मंगळवारी विशेष बैठक घेण्यात आली. त्यानुसार सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेसकोड लागू करावा की नाही याबाबत बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर सर्वांच्या संमतीने ड्रेसकोड लागू करण्यात यावा असा ठरावही करण्यात आला. दरम्यान आज हा ठराव मंदिर संस्थानकडे दिला जाण्याची शक्यता असून मंदिर संस्थान यावर काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं आहे. आता सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकोड लागू केल्यास अनेक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. देशभरातून भाविक भक्त या देवी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. शहरी भागासह ग्रामीण भागातील भाविकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.