Nashik News : नाशिकच्या (Nashik)  मालेगाव तालुक्यातील (Malegoan) टोकडे येथील 18 लाख रूपयांचा कागदोपत्री दाखवण्यात आलेला रस्ता चोरीला गेल्याच्या तक्रारीनंतर आता एक-एक प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यावरून जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानदान यांचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. यातील वाद अद्याप सुरुच आहे.


दरम्यान आता या रस्ता चोरी प्रकरणाच्या तक्रारीस वेगळे वळण मिळाले आहे. कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांनी चौकशी करताना द्यानद्यान यांना जो गावापासून दोन किमी लांब रस्ता दाखवला तो खरोखरच खाजगी असल्याचे उघड झाले आहे. चौकशीनंतर प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीमुळे तेथील शेतक-यांना जाग आली आहे. त्यांनी थेट जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन देवून विनापरवानगी शेतीचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासह शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी निवेदन दिले आहे.
    
निवेदनात पुढे म्हटले आहे की टोकडे (Tokde Village) येथील पांझर तलावाजवळ खाजगी शेती क्षेत्र आहे. फेब्रुवारी-2022 मध्ये आम्ही वा आमच्या परिवारातील सदस्य शेतात नसताना अज्ञात व्यक्ती/यंत्रणेकडून दोन-तीन दिवसातच येथे रस्ता बनवण्यात आला. त्यात  जमिनीतून हा रस्ता करण्यात आला. सदर कामाबाबत बाबत आम्हांस कोणतीही संपूर्ण पूर्व सूचना न देता,आमची कुठलीही परवानगी न घेता रस्ता बनवण्यात आला. उपरोक्त संदर्भान्वये आम्हांला विविध प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कळाले की,हा रस्ता आपल्या जि.प.विभागाकडून 18 लाख रुपये खर्चून करण्यात आला आहे.
         
सदर रस्ता करताना संबंधित यंत्रणेने आमची कुठलीही परवानगी घेतलेली नाही,सदर मंजूर कामाबाबत काही एक कळवले नाही,कोणत्याही प्रकारचे मजबूत, परिपूर्ण असे काम अंदाज पत्रकाप्रमाणे काही एक करण्यात आले नाही, दोन तीन दिवसातच कामाचा डाव साधून आमची निव्वळ फसवणूक व शेतीचे नुकसान केलेले आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे.यास जबाबदार सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व आमच्या शेतीचे झालेले नुकसानपोटी आम्हाला एकरी 50 लाख रुपये  मिळावे. अन्यथा आपणा विरोधात आम्हांला उचित न्यायव्यवस्थेकडे दाद मागावी लागेल, असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.  


नेमका काय प्रकरण?


मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील हा सगळा प्रकार आहे. येथील नागरिक विठोबा द्यान द्यान यांनी रास्ता चोरीला गेल्याची तक्रार केली. यावरून सगळं रामायण घडलं आहे. गेल्या अनेक वर्षभरापासून या प्रकरणावरून द्यानद्यान आणि जिल्हा परिषदेत रणकंदन सुरु आहे. अशातच आता ज्या जमिनीतून रस्ता गेला आहे. त्या ठिकाणातील शेतकऱ्यांनी आवाज उठवलं आहे. आम्हाला न विचारता हा रस्ता झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.