Kasba bypoll Election :  पुण्यातील कसबा पेठ (kasba peth bypoll election) विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी कोणाला मिळेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यातच मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक (shailesh Tilak) यांनी नामनिर्देशन पत्र विकत घेतलं आहे. त्यामुळे आता कसब्यातून त्यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. 


आमदार मुक्ता टिळकांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर टिळक कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनी केली होती. त्यांच्यासोबतच मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळक याचं देखील नाव चर्चेत होतं. दोघांकडून पोटनिवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली होती. त्यात आता शैलेश टिळकांनी नामनिर्देशन पत्र विकत घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपकडून किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून अजूनही उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही आहे. मात्र टिळकांनी नामनिर्देशन पत्र विकत घेतल्याने भाजपचा उमेदवार ठरल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे.


पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून कसबा मतदार संघावर अनेकांचा डोळा आहे. भाजपच्याच इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे. त्यात माजी नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने, गणेश बिडकर यांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय मागील अनेक वर्ष कसबा मतदार संघावर ज्यांचं वर्चस्व होतं असे गिरीष बापट यांची सून स्वरदा बापट यांचं देखील नाव चर्चेत होतं. भाजपच्या सगळ्याच इच्छुक उमेदवारांनी या पोटनिवणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र शैलेश टिळक यांनी उमेदवारीची मागणी केल्यानंतर पक्षाने दिलेला आदेश पाळणार असंही भाजपच्या सगळ्या उमेदवारांनी स्पष्ट केलं होतं. 


शिंदे गट भाजपला साथ देणार


कसबा पेठ पोटनिवडणूक शिंदे गट लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे, मंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली होती. कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट भाजपला पाठिंबा देणार असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. शिंदे गट आणि भाजप युती कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 


महाविकास आघाडीत रस्सीखेच


कसबा मतदार संघाच्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षाने या जागेसाठी दावा केला आहे. तिन्ही पक्षांच्या इच्छूक उमेदवारांची मोठी यादी आहे. त्यात ही जागा राष्ट्रवादीला मिळणार की कॉंग्रेसला मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.  पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.