Nashik News : सीमावर्ती आदिवासी भाग गुजरातला (Gujarat) जोडण्यासंदर्भातील वाद उफाळल्यानंतर शासनाने आश्वासन दिले. नुकताच शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या घेऊन आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च (Long March) झाला. मात्र तरीदेखील आदिवासी बांधवांचे स्थलांतर काही केल्या थांबत नाही. आजही नाशिकजवळील गिरणारे येथे अनेक आदिवासी कुटुंब रोजगाराच्या प्रतीक्षेत चूल मांडून बसल्याचे चित्र आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana), पेठ, त्र्यंबकेश्वर (Trymbakeshwer), हर्सूल आदी भागात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात. दोन वेळचं जेवण मिळालं तरी समाधानी असणारे ही लोक मात्र आजच्या शासनाच्या उदासिनतेची शिकार होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी सुरगाणा सीमावाद पेटला. त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत उठाव केला. मात्र हा उठाव देखील काही काळापुरता राहून पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. आता शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च निघाला. मात्र यानंतरही आदिवासी बांधवांच्या नशिबी उपेक्षाच असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्तरावर रोजगाराची उपलब्धता नसल्याने मार्च संपता संपताच सुरगाणा पेठ तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी बांधवांचे स्थलांतर होण्यास सुरुवात झाली आहे. 


नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हर्सूल, त्र्यंबकेश्वर आदी भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव (Trible) राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध योजना या गावांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे आजही पाण्याचा आरोग्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न जैसे थे आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वी सुरगाणा गुजरात वाद झाल्याने हे मुद्दे प्रकर्षाने समोर आले होते. मात्र त्यानंतर शासनाने आश्वासन देत हे मुद्दे देखील बासनात गुंडाळले. तर आता नुकतंच सर्वांचं लक्ष वेधून घेणारा शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च देखील काढण्यात आला. या लॉन्ग मार्चच्या देखील अशाच काहीशा मागण्या होत्या. सुरगाणा परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या लॉन्ग मार्चमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र काही अंशी मागण्या मान्य करुन इतर मागण्यांना खो देत हा लॉन्ग मार्च देखील शासनाने हाणून पाडल्याचे एकूणच सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे.


बारा तास घाम गाळून तीनशे रुपये 


नाशिक जवळील गिरणारे (Girnare) हे गाव रोजगाराचे केंद्र म्हणून ओळखलं जातं. मार्च महिना लागला की दरवर्षी या गावात हर्सूल भागातील गुजरात सीमेवरील अनेक गावाच्या गाव, कुटुंबाच्या कुटुंब या ठिकाणी येत असतात आणि इथूनच गिरणारे पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग आपल्या शेतातील काम करण्यासाठी कुटुंबाच्या कुटुंब देत असतो. मग कोणी रोजंदारीने तर कधी थेट शेतातील कामे तोडून घेऊन उदरनिर्वाह करावा लागतो. एकीकडे दैनंदिन मजुरी करणाऱ्या मजुरांचा दर बघितला तर माणसी 500 ते 550 रुपये हा रोज मजुरांना मिळत असतो. मात्र स्थलांतरित आदिवासी मजुरांना दहा ते बारा तास घाम गाळून हाती केवळ तीनशे ते सव्वा तीनशे रुपये येत आहेत आणि ते त्यातच समाधानी असल्याचं दिसून येत आहे. स्थलांतर काही आजचेच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. हे स्थलांतर थांबण्यासाठी शासनाने स्थानिक पातळीवर रोजगार हमीसारख्या योजना त्याचबरोबर इतर रोजगारची साधने उपलब्ध करुन देणं महत्त्वाचं ठरतं.


रोजगार हमीचं काय झालं? 


नाशिकपासून जवळ असलेल्या गिरणारे गावात आज सकाळी गेलात तर हजारोच्या संख्येने आदिवासी कुटुंबे जीव मुठीत धरुन दोन तासाचा प्रवास अवघ्या 300 ते चारशे रुपयांच्या मजुरीसाठी करत आहेत. आता तर याच नाक्यावर संपूर्ण कुटुंबासह संसार बांधून कुणी काम देईल या आशेवर रस्त्यावरच पाल मांडून बसलेले दिसून येतात. मग गावात रोजगार देणाऱ्या रोजगार हमी योजनेचं काय झालं? या लोकांना का स्थलांतर करावं लागतंय? या उहापोह होणं गरजेचे आहे.