Alphonso Mango on EMI in Pune:  पुणे तिथे काय उणे असं आपण कायम ऐकतो. पुण्यातील लोक आणि पुणेकरांच्या आयडियाच्या कल्पना राज्यभर प्रसिद्ध होतात आणि राज्यभर या कल्पनांंची चर्चा देखील होते. सध्या आंब्यांचा (Mango) सीझन सुरु आहे. गुढीपाडवा झाला की अनेक लोक आंब्यांवर ताव मारतात. याच आंब्याची पेटी आता पुण्यात EMI वर मिळणार आहे. सध्या EMI चं जग आहे. कोणतीही मोठी वस्तू विकत घ्यायची असल्यास आपण EMI वर घेत असतो. मात्र आता थेट आंब्याची पेटी EMI मिळत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. 


पुण्यातील गौरव सणस हे व्यावसायिक मागील अनेक वर्षापासून सिंहगड रस्ता परिसरात आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापूस मिळतो. या वर्षापासून त्यांनी दुकानात EMI वर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या कल्पनेला यशही आलं असून आतापर्यंत त्यांच्याकडून दोन ग्राहकांनी ईएमआयवर आंबे विकत घेतले आहेत. हा भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा गौरव सणस यांनी केला आहे.


गौरव सणस म्हणातात की, सामान्य माणून अनेक महागड्या वस्तू EMI वर घेत असतात. त्यांना या वस्तू  EMI वर घेणं परवडतं. त्यामुळे जर महागडे आंबे किंवा हापूस सारखे आंबे जर EMI वर दिले तर अनेकांना आंब्याची चव चाखता येईल. त्यामुळे आम्ही आंबे EMI वर विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि या उपक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


आंब्याचा दर किती?


पुण्यात रत्नागिरी हापूस आंब्याबरोबरच कर्नाटकचा हापूस आंब्यांचीही पुण्यातील मार्केट यार्डात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आवक होते. या दोन्ही आंब्यांच्या किमतीत फारसा फरक नसतो. मात्र चवीत मोठी तफावत असते. त्यामुळे अनेक पुणेकर निरखून आंबा खरेदी करतात. साधारण 800, 1000 ते 1200 रुपये एक डझन आंब्यासाठी मोजावे लागत आहेत. तर तीन ते साडे तीन हजार रुपये एका आंब्याच्या पेटीची किंमत आहे. आंब्याच्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र आंब्यांच्या दर आता जे आहे तेच कायम राहतील, असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे काही ठिकाणी आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण झाली होती. त्यात काही परिसरात तापमानातील उच्चांकामुळे आंब्यावर काळे डागदेखील पडले आहेत. मात्र फटका बसूनही आंब्यांच्या दरात फारशी घट झाली नाही आहे.