Maharashtra Weather : हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.


20 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. आजही पावसाच्या तीव्रतेची निश्चिती मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अधिक जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 


परभणी जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू तर चार जण जखमी


परभणी जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, परभणी, गंगाखेड तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील उखळी येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब बाबुराव फड (वय 60 वर्षे), परसराम गंगाराम फड (वय 40 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर परभणी तालुक्यातही दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राहिबाई बाबुराव फड (वय 75 वर्षे), सतीश सखाराम नरवाडे (वय 29 वर्षे), राजेभाऊ किशन नरवाडे (वय 35 वर्षे) हे जखमी झाले आहेत.        


मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा अंदाज 


मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे. तर विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता अधिक जाणवत आहे.   


नाशिक जिल्ह्यात गारपीट 


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कारण याचा फटका द्राक्षाच्या घडावर होत आहे. काही ठिकाणी द्राक्षाचे घड गळून पडत आहेत. तसेच मण्यांना तडे देखील जात आहेत.  


महत्त्वाच्या बातम्या:


ऐन उन्हाळ्यात शिमल्यासारखी स्थिती, अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान