Nashik Mahashivratri : नाशिक शहर (Nashik) असो किंवा जिल्हा धार्मिक परंपरेचा मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. प्रत्येक गावात पुरातन मंदिरे आपल्याला आढळून येतात. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक महादेव मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) दर्शनासाठी प्रचंड गर्दी आहे. नाशिकसह जिल्ह्यात अनेक शिवमंदिरे असून आज भक्तिभावाने भाविक दर्शन घेत आहेत. 


कपालेश्वर महादेव मंदिर 


नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील (Panchavati) गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. देशातील सर्वच महादेव मंदिरात नंदी पाहायला मिळतो. मात्र नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिर याला अपवाद आहे. महादेवांचं हे एकमेव मंदिर आहे, ज्याठिकाणी नंदीच नाही. महादेवांना ज्यावेळी ब्रह्म हत्येचं पातक लागलं. नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्ह हत्येच्या दोषातुन मुक्त सांगितले जाते. 


नारोशंकर मंदिर 


नाशिकच्या पंचवटी जवळील गोदावरी नदीच्या काठावर नारोशंकराचे हे सुंदर मंदिर वसलेले आहे. हे मंदिर 1747 मध्ये नारोशंकर राजेबहाद्दूर यांनी माया आर्किटेक्चर नावाच्या स्थापत्यकलेच्या अद्वितीय शैलीमध्ये बांधले होते. मुख्य मंदिर एका व्यासपीठावर बांधलेले असून आतील भाग तसेच बाह्य भाग अप्रतिम कोरीव कामांनी सुशोभित केलेले आहेत. ज्यामध्ये विस्तृत लेसवर्क, मोर मण्यांच्या माळा इ. मंदिरात वाघ, माकडे, हत्ती इत्यादी प्राण्यांचे कोरीव काम देखील आहे. मंदिराचे चारही कोपरे छत्र्यांनी सजवलेले असून ज्यांना सामान्यतः ‘मेघडंबरी’ किंवा ‘बारासती’ म्हणतात; त्यापैकी फक्त तीन अस्तित्वात आहेत, बाकीचे गोदावरी पुरात वाहून गेले आहेत.


श्री सोमेश्वर मंदिर


सोमेश्वर मंदिर हे नाशिक मध्यवर्ती बस स्थानकापासुन 8 कि.मी अंतरावर गंगापूर रस्त्यावर आहे. गोदावरी तीरी असलेल्या या मंदिरात भगवान शिव आणि हनुमानाची मूर्ती असून परिसर वृक्षवेलींनी वेढलेला आहे. दर्शनांनतर नदीत बोटिंग आणि पोहण्याचा आनंद घेता येतो. सोमेश्वर हे चित्रपटांच्या शूटिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. सोमेश्वरला जाताना ‘’आनंदवल्ली’’ नावाचा परिसर लागतो. या परिसराचे नाव पेशवे राघोबादादा यांचे पत्नी आनंदीबाई यांच्यामुळे ठेवण्यात आले आहे.


श्री महादेव मंदिर 


मालेगांव भागाचे राजे श्रीमंत सरदार नारोशंकर राजेबहादूर यांच्या कतृत्वाने निर्मित मालेगांवचा भुईकोट किल्ला व त्यालगत असलेले श्री महादेव मंदिर, श्री किल्ला हनुमान मंदिर, वावीकरांचे श्री निळकंठेश्वर मंदिर, सटवाजी बुवा यांचे श्री विठ्ठल मंदिर, श्री रामसेतू हनुमान मंदिर, शिंपी समाजाचे शनीमंदिर लगतच श्री सत्यनारायण मंदिर असा हा धार्मिकदृष्ट्या समृद्ध परिसर आहे. साधारणपणे किल्ला बांधताना मोसमनदी पात्रात मधोमध श्री महादेव मंदिर निर्माण केले गेले आहे. सदर मंदिर काळ्या पाषाणातून साकारलेले आहे. भक्कम दगडी पाया व चिरेबंदी, त्यावर तीन फूट रुंदीच्या दगडी भिंती असे हेमाडपंती शैलीतील विटा आणि चुण्यात बांधलेले सुबक कळसयुक्त मंदिर बघताच नजरेत भरते. 


गोंदेश्वर महादेव मंदिर 


नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे गोंदेश्वर महादेवाचे अति प्राचीन मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिरास राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून 1909 साली घोषित केलेले आहे. हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 12 व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे


त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर


त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर हे भारतीतील बारा जोतिर्लिंगापैकी एक आहे. नाशिक शहरापासून 28 किमी आणि नाशिक रोडपासून 40 किमी अंतरावर असलेल्या त्र्यंबक शहरातील एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकजवळ आहे. सध्याचे मंदिर पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी बांधले होते. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे.