Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) पुंडलिकनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणीला तिच्या मित्राने बोलणे बंद केल्याने तिने आईला दोष देत गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपला मित्र आपल्यासोबत बोलत नसल्याने होस्टेल सोडून घरी आलेली तरुणी सतत चिडचीड करीत होती. तर आईमुळे हे सर्व घडत असल्याचं तिला वाटत असल्याने तिने आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांनी धाव घेऊन महिलेची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर घटनेची माहिती मिळताच, दामिनी पथकाने तरुणीला मनोविकार तज्ज्ञांकडे दाखल केले आहे.
याबाबत दामिनी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक 17 वर्षांची मुलगी आईवडील, लहान बहीण आणि भावासोबत पुंडलिकनगरमध्ये राहते. सरिता अभ्यासात हुशार असून, तिला दहावीत कुठल्याही क्लासेसमध्ये न पाठवता 85 टक्के गुण मिळाले होते. तसेच तिला स्कॉलरशिप मिळाली होती. गुण चांगले असल्याने तिचा चांगल्या कॉलेजला नंबर लागला. पुढे तिने विज्ञान शाखेत शिक्षण सुरु केले. दरम्यान या काळात ती एका होस्टेलमध्ये राहू लागली. याचवेळी तिची एका मुलासोबत मैत्री झाली. ती त्याच्या प्रेमात पडली.
आईला खाली पाडून तिचा गळा आवळला
आधी मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेल्या या तरुणीच्या प्रेमकहाणीची कुणकुण तिच्या आई-वडिलांना लागली. त्यामुळे त्यांनी तिला शिक्षणावर लक्ष दे, असा सल्ला देऊन मैत्री, प्रेम याला विरोध केला. त्यामुळे तिच्या मित्रानेही तिच्याशी बोलणे थांबविले. याचा सरिताला राग आला आणि पंधरा दिवसांपूर्वी ती होस्टेल सोडून घरी परतली. पण घरी आल्यावर तिची होणारी चिडचीड पाहून आईने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी तर तिने आईवर हात उगारला. दरम्यान गुरुवारी तिच्या मित्राने तिला स्पष्टपणे मला फोन करु नको, असे सांगितले. त्यावर चिडलेल्या सरिताने आईला खाली पाडून तिचा गळा आवळला.
दामिनी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
या सर्व घटनेची माहिती मिळताच दामिनी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुलीच्या आई-वडिलांना ताब्यात घेत ठाण्यात नेले. तसेच मुलीला देखील बोलावून घेतले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करुन, डॉ. कादरी यांच्याशी संपर्क साधून मुलीवर उपचार करण्याची विनंती केली. त्यांनी तिला दाखलही करुन घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad Police: एसीपीनंतर आता पीएसआयनेही केले महिलांशी गैरवर्तन; पोलिसात तक्रार दाखल