Sanjay Raut : आम्ही पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊ, असा विश्वास शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. काळाच्या पोटात काय दडलंय हे येणारा काळच सांगेन. जे लोक तिकडे गेलेत ते पुन्हा निवडून येणार नाहीत. ते पुन्हा कोणत्याही सभागृहात दिसणार नाहीत हे मी खात्रीने सांगत असल्याचे राऊत म्हणाले. जनतेत भावनिक वातावरण निर्माण झालं आहे. तसेच चीड आणि संतापही आहे. पक्ष, चिन्ह बळकावण्याचा कट हा आधीच ठरला होता. त्यानंतरच पक्ष फोडला आहे. यामागं दिल्लीची महाशक्ती असल्याची टीका संजय राऊतांनी केली. देशात लोकशाहीच्या नावानं राजकीय हिंसाचार सुरु असल्याचेही राऊत म्हणाले. 


Shivsena : 40 आमदार म्हणजे शिवसेना नाही


जे कंपनावर बसले होते, ज्यांना उड्या मारायच्या होत्या, त्यांनी उड्या मारल्या आहेत. उड्या मारणारे म्हणजे शिवसेना नाही. 40 आमदार आणि 10-12 खासदार म्हणजे शिवसेना नाही. जमिनीवर जी शिवसेना आहे, ती खरी शिवसेना आहे. त्या शिवसेनेमुळे हे आमदार आणि खासदार झाल्याचे राऊत म्हणाले. मात्र, याचा विचार निवडणूक आयोगाने केला नाही. निवडणूक आयोगाने किती आमदार फुटले यावरुन निर्णय घेतला आहे. असा निर्णय कोणी घेतं का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. 


Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख


उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख राहतील तेच आमचे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. हे निवडणूक आयोग ठरवणार नाही. त्यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे. कोण शिंदे गट त्यांनी त्यांचं पाहावं. शिवसेना नाव तसेच राहिल. आमच्या शाखा आणि शिवसैनिक तिथेच बसतील तिथेच राहतील. पक्ष आमचाच आहे. निवडणूक आयोगाकडून निर्णय लिहून घेतला म्हणजे पक्ष कुठेही जात नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. शिवसेना भवनासह, शाखा आणि लाखो शिवसैनिक आमच्यासोबतच राहतील असेही राऊत म्हणाले.


निवडणुका घ्या, मग शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल


देशात लोकशाहीच्या नावाने चाललेला राजकीय हिंसाचार चालला आहे. सुडाच राजकारण सुरु आहे. निवडणुका घ्या, मग शिवसेना कोणाची आहे याचा निकाल लागेल असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाचा गळा दाबून निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. मात्र, जिथे ठाकरे तिथे शिवसेना असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Uddhav Thackeray : पुढची भूमिका काय? उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; आमदार, खासदार राहणार उपस्थित