Maharashtra Rain : सध्या राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं करपू लागली आहेत. तसेच पाऊस नसल्यामुळं खरीपाच्या पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) हे सातत्यानं राज्यातील पावसाच्या अंदाजाबाबत भाष्य करत आहेत. मात्र, यावर्षी आत्तापर्यंत त्यांनी सांगितलेले सर्व पावसाचे अंदाज चुकले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातील राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज पंजाबराव डख पाटलांनी वर्तवला होता. मात्र, अद्यापही राज्यात पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
नेमकं काय म्हणाले होते पंजाबराव डख?
22, 23 आणि 24 मे रोजी विदर्भासह मराठवाडा तसेच राज्यातील बहुतांश भागात भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला होता. मात्र, त्यांचा हा अंदाज चुकला आहे. 26, 27 मे पासून मान्सून सक्रिय होणार आहे. त्यानंतर 31 मे आणि 1 2 आणि 3 जून या दिवशी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला होता. मात्र, त्याप्रमाणे पाऊस पडला नाही. केरळमध्ये 8 जूनला मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर 8, 9 आणि 10 जूनला राज्यात मॉन्सूनचा पाऊस पडणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी त्यानुसार तयारी ठेवावी. यंदा पेरणीसाठी खूप पोषक वातावरण असणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तवला होता. मात्र, त्यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार अद्यापही राज्यात पाऊस पडला नाही.
महाराष्ट्रात मान्सून येण्यासंदर्भात वर्तवलेला अंदाज चुकला
साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी 8 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. 1, 2 आणि 3 जूनला केरळमध्ये मान्सून आगमन होणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्ष केरळमध्ये मान्सून 8 जूनला दाखल झाला. महाराष्ट्रत मान्सून 8 जूनला दाखल होण्याचा अंदाजही पंजाबराव डख यांनी वर्तवला होता. मात्र, राज्यात 11 जूनला मान्सून दाखल झाला. डख यांनी सांगितल्याप्रमाणे 8 जूनला मान्सून राज्यात दाखल झाला नाही.
3 ते 10 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता मात्र...
3, 4 आणि 5 जूनला उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला होता. 4 जूनपासून राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी सांगितला होता. दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस पडतो. मात्र, यावर्षी सोलापूर जिल्ह्यात भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या अंदाजानुसार अद्याप तरी सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला नाही. 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाऊस पडलेला दिसेल असेही त्यांनी सांगितले होते. 3 ते 10 जूनपर्यंत राज्यात असा पाऊस पडले की गुडघ्यापर्यंत पाणी साचेल असा अंदाज डख पाटलांनी व्यक्त केला होता. मात्र, आज 16 जून आहे, तरीदेखील राज्यात पाऊस नाही.
महत्त्वाच्या बातम्या: