Nandurbar News : शिक्षणाची जिद्द अंगी असली तर परिस्थिती ही तिला शिक्षणापासून (Education) थांबू शकत नाही, गावातील जिल्हा परिषद शाळेत, त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मुबारकपूर येथील मेघा पवार या विद्यार्थिनीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या औषध निर्माण शास्त्र अर्थात फार्मसीच्या परीक्षेत गोल्ड मेडल (Gold Medal) मिळवले आहे. 


मेघा गणेश पवार (Megha Ganesh Pawar ही आदिवासी परिवारातील असून परिस्थितीशी दोन हात करत तिने हे यश संपादन करत आदिवासी भागातील (Satpuda) मुलींसाठी नवीन आदर्श निर्माण केला आहे. मुबारकपूर (Mumbarakpur) गावातील रहिवासी आई-वडील भावंड असा परिवार या परिवाराची सर्व मदार शेतीवर अवलंबून झोपडी वजा घर मात्र आई वडिलांची मुलीला उच्चशिक्षित करण्याची इच्छा त्यासाठी मुलीनेही परिस्थितीशी दोन हात करत गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शहादा येथील तालुक्याच्या ठिकाणी गेली. बारावी सायन्स नंतर शिरपूर (Shirpur) येथील आरसी पटेल फार्मसी कॉलेजला तिने डिप्लोमानंतर डिग्री आता मास्टर डिग्रीत गोल्ड मेडल मिळवले आहे. 


सुट्टीच्या दिवशी गावी आलेली मेघा शेतीत आई वडिलांना हातभार लावायची. त्यानंतर दिवसभराच्या कामानंतर रात्री आपला अभ्यास पूर्ण करत तिने यश संपादन केले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून (North Maharashtra University) तिला गोल्ड मेडल मिळाले आहे. मेघा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना देतात त्यासोबत परिस्थितीशी दोन हात केल्यानंतर यश मिळतेच असे सांगताना तिचे डोळे पाणवतात. आपल्या मुलीने उच्च शिक्षण घेऊन आपलं नाव करावे, त्यासाठी लागणारा खर्च आम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू, मात्र तिची शिक्षणाची जिद्द आणि आमचं स्वप्न तिने पूर्ण केल्याचा आम्हाला आनंद आहे. 


पहिली उच्चशिक्षित तरुणी


मेघा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या आदिवासी बहुल गावातील पहिली उच्चशिक्षित तरुणी आहे.  तिने आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाचा सेवेसाठी आणि समाजातील तरुण पिढीला आदर्श निर्माण करण्यासाठी करावा अशी अपेक्षा तिच्या आई-वडील आणि तिचे शिक्षक व्यक्त करतात. यशस्वी होण्याची जिद्द आणि परिस्थितीशी दोन हात करण्याचा सामर्थ्य अंगी बाळगल्यानंतर यशाला गवसणी घालता येते. हे मेघाकडे पाहिल्यानंतर जाणवते. घरच्या परिस्थितीचा बाऊ न करता उच्चशिक्षित झालेली मेघा सातपुड्यातील आदिवासी तरुणींसाठी एक आदर्श ठरली आहे.