Pune Accident : पुणे शहरात आणि सपासच्या परिसरात सध्या अपघाताचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. दोन बसचा आणि दोन कंटेनरचा अपघात झाला आहे. पुण्यातील खेड शिवापूरला हा अपघात झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका नऊ वर्षीय मुलीचा समावेश आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मुंबई आणि बंगळुरुच्या लेन ठप्प झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरु महामार्गावरील एका लक्झरी बसची एका कंटेनरला धडक बसली आणि ती नियंत्रण सुटून मध्यवर्ती दुभाजकावर आदळली. भरधाव वेगात असलेला कंटेनर सातारा लेनवर आदळून दुसऱ्या ट्रकला धडकला. कंटेनरच्या अचानक हालचालीमुळे ट्रक आणि राज्य परिवहनच्या शिवशाही बसची पाठोपाठ टक्कर झाली. अपघातानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी खळबळ उडाली. राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवलं मात्र यात दोघांनी जीव गमवला. या धडकेमुळे मुंबई-बंगळुरु महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि दोन्ही मार्गे खोळंबली. बंगळुरु आणि मुंबईच्या दिशेने वाहनांची वाहतूक कोंडी पूर्ववत करण्यासाठी तीन तास प्रयत्न केले. 


नऊ वर्षीय ऋतुजा रवींद्र चव्हाण आणि खाजगी बसचा चालक शिवराज कुमार अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत तर रत्ना रवींद्र पुजारी (वय 39 वर्षे), रवींद्र रामा पुजारी (वय 41 वर्षे) ( दोघेही रा. ठाणे मुंबई ), विना प्रभाकर गौडा (वय 34 वर्षे), ज्योती जयराम गौडा (वय 39 वर्षे),पर्वतमा देवे गौडा (वय 42 वर्षे), हेमा अण्णा गौडा (वय 35 वर्षे) सर्व रा. मुंबई मिनाक्षी मायशेट्टी गौडा (वय 35 वर्षे), संजू रवी गौडा, (वय 24 वर्षे), प्रदीप नज्जाप्पा गौडा (वय 25 वर्षे) अशी जखमींचे नावे असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.


अपघातांना ब्रेक कधी?


पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यावर उपाय राबवूनही अपघातांची संख्या वाढत असल्याने नेमका दोष कोणाचा? आणि अपघाताचं सत्र कधी थांबणार, असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.