मुंबई : ऑनलाईन अॅपद्वारे होणाऱ्या अर्थिक व्यवहारामध्ये सध्या वाढ झाली आहे. इंटरनेटद्वारे मोबाइलची हाताळणी करताना अनेक जाहिराती येत असतात. त्यात एका क्लिकवर ऑनलाइन कर्ज, अशा जाहिराती सातत्याने दिसतात. या जाहिरातीला क्लिक केले की ते संबंधित अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. अशा बोगस लोन अॅपच्या माध्यामातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महाराष्ट्र सायबर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात गुगल प्ले स्टोरला पत्र लिहित अशी बोगस अॅप प्ले स्टोरमधून कढून टाका किंवा डिलीट करा अशी सूचना केली आहे. 


डिजिटल बॅंकिंग किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्थिक व्यवहार करताना फसवणुकीचे किंवा फ्रॉडचे प्रकारदेखील वाढले आहेत. कर्ज देणारे अनेक अॅप (Loan App) हे बनावट असतात आणि त्यांचा हेतू लोकांना फसवणे हाच असतो. अशा 13 बोगस अॅपची यादी हाती लागल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुगल प्ले स्टोरला एक पत्र लिहले आहे. संबंधित 13 अॅप तुमच्या नियम व अटींची पुर्तता करत नसतील तर त्या अॅपना तुमच्या प्ले स्टोरमधून काढून टाका अथवा डिलीट करा अशी सूचना केली आहे. दरम्यान अशाप्रकारचे आणखी 18 अॅप सायबर पोलिसांच्या स्कॅनर खाली आले असून त्या अॅप्स बाबत सायबर पोलिस गुगलला लवकरच पत्र लिहणार आहे.


महाराष्ट्र सायबर पोलिसांना सुमारे 1829  कर्ज फसवणुकीच्या ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र सायबरकडे तक्रार आल्यानंतर डॉ. ते स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देतात. त्यानुसार आजपर्यंत तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सुमारे 9 नॉन कॉग्निझेबल (NC) प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सायबर गुन्ह्याची तक्रार लोक 1930 या हेल्पलाइन नंबरवर करू शकतात किंवा त्यांची ऑनलाईन तक्रार cybercrime.gov.in वर नोंदवण्याचे आवाहन, महाराष्ट्र सायबर पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी ही माहिती दिली. 


संबंधित बातम्या :


Crime News : जीवघेणी लोन ॲप्स! मोबाइल ॲपवरुन कर्ज घेणाऱ्या लोकांचे 'ब्लॅकमेलिंग'; गुगलनंही घेतली दखल