Loan Apps Crime News : कोव्हिड काळात (Covid19) मोबाईल ॲपद्वारे (Mobile Apps) सुलभ कर्जाचे आमिष दाखवून अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. लोन ॲप्सचे (Loan Apps) लोळ अनेक ठिकाणी पसरले आणि अनेकांचे संसार देखील रस्त्यावर आलेत. काय आहे हा एकूण प्रकार? काय होतंय सध्या महाराष्ट्रात? कशी होतेय फसवणूक? जाणून घेऊया


कर्ज फेडण्यासाठी धमक्यांचे फोन, नैराश्यानी अनेकांनी संपविली जीवनयात्रा
कर्ज फेडताना होणाऱ्या छळाला कंटाळून मुंबईतील संदीपनं आत्महत्या केलीय. संदीपला 'तू कर्ज घेतलंय आणि ते भर' असे फोन सुरु झाले. मात्र त्याने कर्जच घेतले नसल्यानं अशात आपण कर्ज भरणार नसल्याचं तो येणाऱ्या कॉल्सना सतत उत्तर देत असे. अशात, त्याचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हीडिओ त्याच्या कार्यालयातील सहकार्यांना पाठवण्यात आले. सोबतच घेतलेल्या कर्जाचे स्क्रिनशॉट्सही पाठवले. आणि याच सर्व बदनामीमुळे अस्वस्थ झालेल्या संदीपनं आपली जीवनयात्रा संपवली. 


140 ते 145 पर्यंत ॲप्सची संख्या
सध्या अशी अनेक प्रकरणं देशासोबत महाराष्ट्रात देखील उजेडात येतायत. मागील सहा महिन्यात तीन हजारांहून अधिक अशी प्रकरणं समोर आल्याचा अहवाल आहे. भारतातील अनेक राज्यात अशी प्रकरणं वाढू लागल्यानं अनेकांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतंय. प्लेस्टोर किंवा ॲप स्टोअरवर 140 ते 145 पर्यंत अशा ॲप्सची संख्या आहे. फक्त लोन किंवा कॅश असा जरी उल्लेख केला तर संपूर्ण यादीच समोर येते. 


जीवघेणी लोन ॲप्स! 


लोन ॲप डाऊनलोड करताना तुमच्याकडून सर्व माहितीची परवानगी घेतील जाते. ज्यामुळे तुमच्या यादीतील कॅन्टॅक्ट नंबर, गॅलरीतील फोटो, सोशल मीडियातील ॲक्सेस मागितला जातो. नंतर कर्ज फेडताना उशीर झाल्यास तुम्हाला धमक्यांचे फोन आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात होते. फोटो मॉर्फिंग टूलचा वापर करत ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार देखील उघडकीस आली आहेत. दरम्यान, पैसे देताना देखील टॅक्स किंवा सर्विस फीच्या नावाने पैसे कापले जातात आणि अव्वाच्या सव्वा व्याज लावण्यात येतं. ज्यामुळे अनेकांना हे पैसे त्वरीत भरणे देखील शक्य होत नाही. सामान्यतः गरीब कुटुंबातील लोकांकडून ह्याचा वापर अधिक वापर होतो. 


गुगलनं देखील घेतली दखल 
पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी बनावट बॅंक खाती आणि मोबाइल फोन वापरतात. पोलिस तपास करायला गेले की हे आरोपी जंगलाकडे पळ काढत असल्यानं देखील अडचणी निर्माण होतात. जंगलातून कार्यरत असल्यानं त्यांचा शोध घेणं कठिण होतं. पोलिस तपासात आरोपी हे राजस्थान आणि हरियाणातून कार्यरत असल्याचं देखील समोर आलंय. मोबाइल ॲपवरुन कर्ज घेणाऱ्या लोकांचे ब्लॅकमेलिंग होत असल्याचं समोर आल्यानंतर गुगलनं देखील याची दखल घेतलीय. यापुढे अशा ॲप कंपन्यांना आरबीआयचा परवाना दाखवणे बंधनकारक केलंय.


बॅंकांचा पर्याय निवडावा
अनेक फिनटेक कंपन्या या व्यवसायात आहेत. काही चांगल्या आहे तर काही वाईट. मात्र, अनेकांकडून याचा गैरफायदा घेतला जातोय. अनेक सामान्य कुटुंबातील लोकं अशा अॅपला बळी पडतायत. सरकारी स्तरावर धोरण आणखं जरी गरजेचं असलं तरी सध्या अशा ॲपला बळी पडण्याऐवजी बॅंकांचा पर्याय निवडावा. कारण, अशा जीवघेण्या ॲप्सपेक्षा बॅंका या उत्तम पर्याय आहेत.