Sharad Pawar : आज दिवसभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आज फोटोवरून ट्विटर वॉर रंगले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्येच्या दौऱ्याला होणारा विरोध हा एक ट्रॅप असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी हा सापळा कोणी रचलाय यावर स्पष्ट भाष्य केले नव्हते. मात्र, आज मनसे नेत्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेच्या आरोपांना फोटोतूनच उत्तर दिले.
मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटरवर फोटो वॉर सुरू होते. मनसेने भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवारांचा एकत्र असलेला फोटो शेअर केला. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेने केला.
मनसेचे सचिन मोरे यांनी एक ट्वीट केलं आहे. याट्वीटमध्ये त्यांनी बृजभूषण सिंह आणि शदर पवार यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…"
मनसे नेते गजानन काळे यांनी हे ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, ""ब्रिज" चे निर्माते ... सुज्ञास अधिक सांगणे न लगे ... ( फोटो झूम करून पाहावा...)" असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
त्यानंतर मनसेच्या याच फोटोला राष्ट्रवादीनेही फोटोच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे आणि शरद पवारांचा फोटो ट्विट केलाय. काही फोटो चांगले असतात असं कॅप्शन मिटकरींनी या फोटोला दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते क्लाएड क्रास्टो यांनीदेखील मनसेच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, राज ठाकरेंना केलेला विरोध ही वैयक्तिक भूमिका असल्याचा दावा करणाऱ्या बृजभूषण सिंह यांनी काल मात्र ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या या दौऱ्यात खोडा घालणारा भाजपमधला नेता कोण? अशीही चर्चा सुरु झाली आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार-सुप्रिया सुळे एकत्र असलेला फोटो हा 2018 मधील आहे. मावळमध्ये कुस्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने सिंह महाराष्ट्रात आले होते. बृजभूषण सिंह हे अखिल भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर, शरद पवार यांच्याकडे राज्यातील कुस्ती संघटनेची धुरा आहे.