Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना पोलिसांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण चांगलेच भोवणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या सर्व प्रकरणाचा अहवाल अप्पर मुख्य सचिव गृह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता बांगर यांच्याविरुद्ध कायदेशीर काही कारवाई केली जाणार का? याची देखील चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप बांगर यांच्यावर करण्यात आला आहे, ते माजी सैनिक असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
27 ऑक्टोबर रोजी आमदार संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात असतांना त्यांच्यासोबत 15 कार्यकर्ते देखील होते. मात्र याचवेळी गेटवर ड्युटीला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पासबाबत विचारपूस केल्याने आमदार बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. दरम्यान या कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची नोंद पोलीस डायरीत केली होती. त्यानंतर याबाबत 'एबीपी माझा'ने आज सकाळी बातमी दाखवली होती. त्यामुळे अखेर या घटनेचा अहवाल अप्पर मुख्य सचिव गृह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. ज्यामुळे आता आमदार बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे प्रकरण...
आमदार संतोष बांगर हे काही कामानिमित्ताने 27 ऑक्टोबरला मंत्रालयात आपल्या काही कार्यकर्त्यांसह गेले होते. दरम्यान गार्डन गेटमधून बांगर प्रवेश करत असतानाच त्यांना, तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवून पास बाबत विचारपूस केली. पोलीस कर्मचाऱ्याने पासबाबत विचारल्याने संतप्त बांगर यांनी त्याला शिवीगाळ केली. तर मी कोण आहे मला ओळखत नाही का? म्हणून वाद घातला. या वादाच्या घटनेची संबधित पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस डायरीत नोंद घेतली. तर आता याप्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे.
कोणतेही शिवीगाळ केली नाही: बांगर
या सर्व प्रकरणावरून आमदार बांगर यांनी देखील प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे. आपण कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद घातला नाही, किंवा शिवीगाळ केली नसल्याचे बांगर म्हणाले. मला पोलीस कर्मचाऱ्याने सन्माने आतमध्ये सोडले होते. वाटल्यास त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही तपासून घ्यावे असेही बांगर म्हणाले आहे. विशेष म्हणजे आमदार बांगर यापूर्वी देखील आपल्या वादग्रस्त विधान आणि शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आले होते.
Santosh Bangar: संतोष बांगर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप