Santosh Bangar: नेहमी कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची पुन्हा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आमदार बांगर यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे, त्याने याविषयी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आमदार बांगर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 27 ऑक्टोबर रोजी आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात असतांना, तिथे ड्युटीवर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबून पासची विचारपूस केली. मात्र पासची विचारपूस केल्याने संतप्त झालेल्या आमदार बांगर यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. तर अशा पद्धतीने आता तू मला शिकवणार का? असे म्हणत बांगर यांनी वाद घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबधित पोलीस कर्मचाऱ्याने या घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली आहे.
मी शिवीगाळ केलीच नाही...
याबाबत 'एबीपी माझा'शी बोलतांना आमदार बांगर म्हणाले की, मी कोणतेही शिवीगाळ केली नाही. तसेच पोलीस कर्मचाऱ्यासोबत आपला कोणताही वाद देखील झाला नसल्याच आमदार बांगर म्हणाले आहेत. गरज पडल्यास गार्डन गेटवर असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करून घावी असेही बांगर म्हणाले. मात्र आपण गार्डन गेटने गेलो होतो हे आमदार बांगर यांनी मान्य केलं आहे.
आमदार बांगर आणि वाद!
- 26 जून 2022 शिवसेनेतील बंडांनंतर वादग्रस्त वक्तव्य
- शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांची मुलं अविवाहित मरतील असं वक्तव्य
- 17 जुलै 2022 ला गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं वक्तव्य
- 15 ऑगस्ट 2022 ला मध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या गोडावून व्यवस्थापकाला मारहाण
- 14 ऑक्टोबर 2022 ला विमान कंपनी कार्यालयात तोडफोड, कृषी अधिकाऱ्याला धमकावलं.
- आणि आता पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप
पोलिसांना शिवीगाळ करणे चुकीचे...
याबाबत प्रतिक्रिया देतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचं सांगण्यात येत आहे. शिवीगाळ झाली किंवा नाही हे अद्याप स्पष्ट व्हायचा आहे. मात्र कोणत्याही पोलिसाला शिवीगाळ करणे हे चुकीचे आहे. जर बांगर यांनी शिवीगाळ केली असेल तर ते चूकच असल्याचं दानवे म्हणाले.