Aurangabad News: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची 7 नोव्हेंबरला औरंगाबादच्या सिल्लोड येथे सभा होणार आहे. मात्र औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना सभास्थळ बदलण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची देखील सिल्लोडमध्ये सभा होणार असून, त्यासाठी सुद्धा पोलिसांकडे परवानगी मागितली गेली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी सिल्लोड येथील जिल्हा परिषद मैदानाची परवानगी शिंदे गटाकडून मागितली गेली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी सिल्लोड येथील चौकात सभा होणार असून, त्यासाठी ठाकरे गटाकडून पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. पण पोलिसांनी दोघांना अजूनही परवानगी दिली नाही. मात्र आदित्य ठाकरे यांना सभास्थळ बदलून पर्यायी जागा देण्याबाबत पोलिसांनी सुचवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आज दुपारपर्यंत या दोन्ही नेत्यांच्या सभेच्या परवानगीबाबत पोलीस निर्णय घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.