Maharashtra News LIVE Updates : लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Feb 2024 04:33 PM
Election Commission : लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी

 Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय घेतलाय. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर करण्याबाबत कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत. राजकीय पक्षांना पोस्टर्स, पॅम्प्लेट वाटप,प्रचार रॅली आणि निवडणूक सभांसह कोणत्याही स्वरूपात निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असे निर्देश केंद्रिय निवडणूक आयोगाचे सगळ्या राजकीय पक्षांना दिले आहेत. 

Pune News : पुणे विद्यापीठातील वादग्रस्त रामायण नाटक प्रकरण

Pune News : पुणे विद्यापीठातील वादग्रस्त रामायण नाटक प्रकरणी पुणे विद्यापीठाकडून स्थापन केलेल्या सत्यशोधक समितीला अजित पवार गटाचा विरोध करण्यात येत आहे. समितीमध्ये जी नावे सध्या समाविष्ट करण्यात आली आहेत, ते समविचार धारेचे असल्याचा अजित पवार गटाचा आरोप आहे. समविचारी सदस्य एकत्र आल्याने निकालावर परिणाम होण्याची अजित पवार गटाने भीती व्यक्त केली आहे. या समितीत दिग्दर्शक नागराज मंजुळे, अतूल पेठे किंवा श्रीरंग गोडबोले यांच्या पैकी दोघांना घेण्याची अजित पवार गटाची मागणी केली आहे. चित्रपट, साहित्य कला आणि सांस्कृतिक विभाग अजित पवार गटाचे प्रमूख बाबासाहेब पाटील यांची विद्यापीठाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Mumbai OBC Meeting :

Mumbai OBC Meeting : ओबीसी जनमोर्चाच्या वतीने मुंबईत राज्यस्तरीय बैठकीचा आयोजन करण्यात आला असून या बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांना हरकती कशाप्रकारे नोंदवल्या गेल्या पाहिजेत. याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने अधिसूचना काढून कुणबी नोंदी देण्यासंदर्भामध्ये आदेश देण्यात आले होते. यालाच विरोध करत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभरातून तीन कोटी हरकती पाठवण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तयार करण्याचे देखील सूचना ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे. आजच्या बैठकीच्या निमित्ताने ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने एका नव्या पक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Gondia Truck Fire : उभ्या ट्रकला लागली आग, संपुर्ण ट्रक जळून खाक
Gondia Burning Truck :  गोंदिया जिल्ह्याच्या दासगाव येथे उभ्या असलेल्या ट्रकच्या डिझेल टँकमध्ये अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केलं. नागरीकांना काही कळण्याच्या आधीच संपुर्ण ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली, तरी ट्रक मालकांचे नुकसान झाले आहे.
Ahmednagar News : पारधी समाजाचे नगरमध्ये बोंबाबोंब आंदोलन

Ahmednagar News :अहमदनगरच्या आदीवासी पारधी संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यक्रमासमोर बोंबाबोंब आणि उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलंय. बेलवंडी आणि घारगांव येथील आदिवासी पारधी तसेच दलित समाजातील सुशिक्षित बेरोजगार मुला - मुलींना सेंट्रल बँक , स्टेट बँकेडून तात्काळ कर्ज देण्यात यावे, राजुर प्रकल्प कार्यालयामध्ये दिलेले सहा बचत गटाच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी आदेश देण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात पारधी समजातील मोठ्या संख्येने युवक सुशिक्षित आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळत नसल्याने व्यवसायासाठी त्यांनी बॅंकेकडे कर्जाची मागणी केली आहे. पण, त्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नाहीय. याला केवळ ते पारधी समाजाचे असल्याने त्यांना कर्ज मिळत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, त्यांना तातडीने कर्ज मिळावे आणि महिलांना देखील आर्थिक साहाय्य व्हावे यासाठी महिला बचत गटांना मंजुरी मिळावी, अशी मागणी करत हे आंदोलन सुरू करण्यात आलंय.

Amravati Jail Bharo Andolan : अमरावतीत आशा आणि गटप्रवतकांचा जेल भरो आंदोलन...
Amravati News : अमरावतीत हजारो आशा सेविका आणि गट प्रवर्तकांनी जेलभरो आंदोलन पुकारलं आहे. अमरावती येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ जेलभरो आंदोलन करण्यात आलं. पगारवाढीच्या प्रश्नावर मागील 22 दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही तोडगा न निघाल्याने आशा सेविका आक्रमक झाल्या आहेत. आशा सेविकांना सरकारने पगार वाढीचे आश्वासन देऊनही पगार वाढीचा जीआर काढला नसल्याचा आरोप, यावेळी करण्यात आला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास पुढे बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशाराही आशासेविकांनी दिला आहे.

 
Satara News: सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा ठिकाणी मेळावा

Satara Lok Sabha Election 2024 : सातारा जिल्ह्यातील  लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा विविध ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जयंत पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्यांचा हा मेळावा होत आहे. सातारा लोकसभा उमेदवारीच्या अनुषंगाने पाटण भागात पहिला मेळावा घेतला आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, कराडचे आमदार बाळासाहेब पाटिल  यांची प्रमुख उपस्थिती आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटिल यांना या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात आले नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Nagpur Govari Andolan : मागील 11 दिवस आमरण उपोषण सुरुच
Nagpur News : आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे 3 आंदोलक नागपुरात मागील 11 दिवस आमरण उपोषणावर बसले आहेत. महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमातीचे इतर लाभ मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. सचिन चचाणे, किशोर चौधरी आणि चंदन कोहरे हे आमरण उपोषणावर बसलेल्या आंदोलकांचे नाव आहेत. गेल्या अकरा दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे आणि म्हणूनच आज या तीन आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आदिवासी गोंड गोवारी जमात संघर्ष हक्क कृती समितीचे हजातो कार्यकर्ते आंदोलक  संविधान चौकात जमा झाले आहे.
Akola Mitkari On Aavhad : पक्षातील एका गटाकडून अजितदादांना त्रास, अमोल मिटकरींचा आरोप
Akola Mitkari On Aavhad : राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असण्यापासूनच पक्षातील एक गट नेहमीच अजितदादांना त्रास देत असल्याचा गंभीर आरोप अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय. या गटाचं नेतृत्व आधीपासूनच डॉ. जितेंद्र आव्हाड करीत असल्याचा पलटवारही आमदार मिटकरींनी यावेळी केलाय. रविवारी बारामतीतील अजितदादांच्या वक्तव्याचा विपर्यास करीत आव्हाड यांनी हा विषय थेट प्रतिभाकाकीच्या कुंकवापर्यंत आणल्याचा आरोप आमदार मिटकरींनी आव्हाडांवर केलाय. आव्हाडांच्या या कृतीला महाराष्ट्र कधीच माफ करणार नसल्याचं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
Hingoli News : कुलस्वामिनी ज्वेलर्स दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने जप्त

हिंगोली शहरातील कुलस्वामिनी महिला आर्थिक पतसंस्थेत दहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणी बँकेतील संचालक मंडळ आणि कर्मचारी असे एकूण 16 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार कैलास खर्जुले आणि बजरंग खर्जुले या दोन भावांना हिंगोलीच्या आर्थिक गुन्हे  शाखेने अटक केले होते. या आरोपींना घेऊन हिंगोलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडे असलेल्या सराफा बाजारातील कुलस्वामिनी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानाची तपासणी केली असता लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आढळून आले आहेत. पोलिसांनी ते जप्त केले असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Honey Village : संपुर्ण राज्यात आता ‘मधाचं गाव‘ ही योजना राबविली जाणार
Madhach Gav : संपुर्ण राज्यात आता ‘मधाचं गाव‘ ही योजना राबविली जाणार


  • आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मिळणार मंजूरी

  • या योजनेसाठी प्रत्येक गावाला 54 लाख रुपयांचा मिळणार निधी

  • उद्योग विभागाचा हा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीच्या पुढे होणार सादर

  • या योजनेसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची समिती काम करणार

  • ही योजना राज्य खादी व ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून राबविली जाणार

Kalyan : महायुतीमध्ये समन्वय नसल्याने अनेकदा अडचणी - आमदार नरेंद्र पवार

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी आमदार नरेंद्र पवार यांनी वक्तव्य केलं आहे. महायुतीमध्ये समन्वय नसल्याने अनेकदा अडचणी येतायत, वरिष्ठांनी तातडीने  लक्ष घालत वादाला पूर्णविराम द्यावा, असं माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

Yavatmal News : 'माणुसकीची भिंत' फाउंडेशनकडून विधवा महिलेला आधार

Yavatmal News : यवतमाळच्या पुसद येथील माणुसकीची भिंत फाउंडेशनकडून गरजवंत महिलेला शिलाई मशीन देऊन तिला रोजगार उभा करून देण्यात आला आहे. गरिबांना अन्न, दररोज जेवण असा उपक्रम अविरत राबविणाऱ्या माणुसकीच्या भिंत सदस्यांनी नुकतेच पतीचे निधन झालेल्या एका निराधार महिलेला मदतीचा हात दिला. महागाव तालुक्यातील मोहदी येथील वर्षा धाडवे या एका महिलेचा पती पाणीपुरीचा व्यवसाय करायचा मात्र त्याचे अचानक हृदयविकारामुळे निधन झाले. त्यामुळे तीन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता. परंतु माणूसकीच्या भिंत मुळे तिला आधार मिळाला आहे.

Wardha News : देवळीच्या सेलसुरा येथील कृषि विज्ञान केंद्रात 52वी शास्त्रीय सल्लागार समिती सभा

देवळीच्या सेलसुरा येथील कृषि विज्ञान केंद्रात 52 वी शास्त्रीय सल्लागार समिती सभा घेण्यात आली. एकात्मिक शेती पद्धतीने खर्च कमी करून अधिक उत्पन्न मिळवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. जिल्ह्यातील शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये चर्चा होऊन नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने शास्त्रीय सल्लागार समिती सभा आयोजित होती.

Dhule Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध पद्धतीने बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई

Dhule Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले असून अवैध पद्धतीने बॅनर लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिले आहेत मात्र आयुक्तांच्या या आदेशाला न जुमानता विविध राजकीय पक्षांकडून सर्रासपणे बॅनर लावण्यात आले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर तसेच दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर यांचा समावेश आहे, विशेष म्हणजे हे बॅनर लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नसल्याची माहिती महापालिकेच्या संबंधित विभागाने दिली आहे यामुळे अवैध पद्धतीने बॅनर लावणाऱ्यांवर महापालिका प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.


 
Wardha News : रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत स्कूल व्हॅन रॅलीचे आयोजन
वर्धा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने स्कूल व्हॅन रॅलीचे आयोजन करण्यात आलं. रॅलीत स्कूल व्हॅनचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने स्कूल व्हॅन रॅलीचे आयोजन करण्यात आलं. रॅलीत स्कूल व्हॅनचा मोठ्या संख्येने सहभाग होता. रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आलं.
Uddhav Thackeray in Rajapur : उद्धव ठाकरे राजापुरात दाखल

Uddhav Thackeray in Rajapur : उद्धव ठाकरे राजापुरात दाखल झाले असून राजन साळवी यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.





Uddhav Thackeray in Rajapur : राजापूरमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

Rajapur Sabha Tayari : राजापूरमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. अगदी थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होईल. दरम्यान या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्थानिक आमदार राजन साळवी यांनी या ठिकाणी पाहणी करून संपूर्ण तयारीचा आढावा घेतला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पुन्हा येण्यासाठी अनेक जण मागच्या दराने इच्छुक आहेत. पण, जनता त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राजन साळवी यांनी केली आहे.

Malegaon Traffic Issue : वाहतूक कोंडीमुळे मालेगावकर हैराण, पोलीस आणि महापालिकेच्या असमनव्य ठरतोय वाहतूक कोंडीचं कारण
मालेगाव : पोलीस आणि मनपा प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे मालेगावकर हैराण झाले आहेत. नवीन बसस्थानकासमोर पुलाचे काम सुरु झाले असताना याठिकाणी वाहतूकीला पर्यायी मार्ग न शोधल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुर्तफा व्यावसायिकांनी थाटलेले अतिक्रमण आणि रिक्षा चालकांनी रस्त्यात उभी केलेली वाहने हे कोंडीचे मुख्य कारण आहे. नवीन बसस्थानकाजवळ जेएटी, एटीटी आदी शाळा आहेत. बसस्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांचा एकच मार्ग देण्यात आल्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक कोंडी होत आहे. शाळा सुटल्यावर आणि भरतांना देखील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन रस्त्यावर मार्गक्रमण करावे लागते.
Ajit Pawar in Solapur : उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात

Jayant Patil on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारपासून सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अजित पवार यांचा पहिला कार्यक्रम हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या इस्लामपूर शहरामध्ये आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इस्लामपूर कार्यालयाचे आज अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहेत. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता त्याचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना पहायला मिळतोय. जयंत पाटील यांच्या गटाचे सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, नेते, नगरसेवक, कार्यकर्ते आज अजित पवार गटाची वाट धरताना दिसत आहेत. यातच आता इस्लामपूर मध्येच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयाचे उदघाटन करुन जयंत पाटील यांना त्याच्या बालेकिल्लातही आव्हान द्यायला अजित पवार गटाने सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

Manmad Railway Bridge : रेल्वेवरील पूल वाहतुकीसाठी खुला, वाहतूक सुरळीत

मनमाड : दीड महिन्यापूर्वी मनमाड येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचा अर्धा भाग कोसळल्याने इंदोर - पुणे महामार्गावरिल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून केवळ दीड महिन्यात 3 कोटी रुपये खर्चून तातडीने पुलाची उभारणी करण्यात येवून हा रेल्वे ओव्हर ब्रीज वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते या पुलाचे मनमाड येथे लोकार्पण करण्यात आले. रेल्वे ओव्हर ब्रीज पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Amravati Accident : अवैध जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात, वाहन चालकासह 6 जनावरांचाही मृत्यू

Amravati News : दर्यापूर ते अकोला मार्गावरील गोळेगाव फाट्याजवळ अवैध जनावरे घेऊन जात असताना जनावराचे वाहन पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात वाहन चालकाचा मृत्यू तर वाहनातील सहा जनावरांचाही मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने वाहन असल्याने टायर फुटल्याने घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मृतक चालकाला दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून पलटी वाहन याला जेसीबीच्या माध्यमातून रस्त्याच्या खाईतून बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळी दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाली होती. काही काळासाठी मुख्य रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. दर्यापूर शहरातून दररोज सकाळी पाच वाजता सुमारास अशाप्रकारे भरधाव वेगाने अवध्य जनावरांचे वाहन अकोला येथे जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, जखमी जनावरांवर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत.

Ratnagiri Leopeard Death : रत्नागिरी जिल्ह्यात दहा वर्षात 82 बिबट्यांचा मृत्यू

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक साखळीतील प्रमुख प्राणी असलेला बिबट्या सध्या संकटात सापडला आहे. कारण वन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, 2013 ते 2023 या दहा वर्षात जिल्ह्यातील विविध तालुक्यात मिळून एकूण 82 बिबट्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे बिबट्याचे सर्वाधिक मृत्यू परिमंडल (वन) संगमेश्वर-देवरुखमध्ये झालेले आहेत. त्यामुळे बिबट्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

Kunal Raut : कुणाल राऊत यांच्या कृतीला जिल्हा परिषद काँग्रेस सदस्यांचे ही समर्थन नाही... कुणाल राऊत यांना काँग्रेस पक्षाकडूनच घरचा आहेर...

Nagpur News : भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या पोस्टरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासण्याच्या कृतीला आपले समर्थन नसल्याची भूमिका नागपूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. मोदींच्या फोटोला काळे फासल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना काल पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणी कुणाल राऊत यांना पक्षातूनच घरचा आहेर मिळाला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष काँग्रेस नेत्या कुंदा राऊत म्हणाल्या शनिवारी जिल्हा परिषद कार्यालय बंद होते. पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नाही ते देशाचे आहेत. त्यामुळे ही कृती समर्थनीय नाही. याप्रकरणी काही लोक आमच्यावर जे आरोप करत आहे, ते राजकीय पोळी शेकत असल्याचही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळे फासल्याप्रकरणी भाजपाकडून आज जिल्हा परिषद परिसरात ठिय्या आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

Akola Fire : तुरीच्या गंजीला आग, एक लाख रुपयांहुन जास्त नुकसान

Akola News : अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील निंबा फाटा येथील येथील शेतकरी यमुनाबाई थोरात यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याने शेतकरी थोरात यांचे अंदाजे एक लाखांहुन जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेय.

Washim News : मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेचा धक्क्याने दोघांचा मृत्यू

वाशिम : वाशीमच्या मानोरा तालुक्यातील आमगव्हाण इथं धोकादायक पद्धतीने मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेचा धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. बांबूला इलेक्टिक तार लावून धोकादायक पद्धतीने मासळी पकडण्यासाठी गेलेल्या दोन इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आमगव्हाण कोंडोली शेतशिवरात घडली आहे. धनंजय  कटारे वय 44 वर्षे आणि गणपत कटारे वय 46 असं मृतकाचं नाव आहे. आमगव्हाण ते कोंडोली शेतशिवरात असलेल्या नाल्यावर धनंजय आणि गणपत हे सकाळी घरातून मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने घरच्या लोकांनी शोध घेतला असता दुपारच्या सुमारास पाण्यात मृत बुडालेल्या स्थितीत दोघांचे मृतदेह आढळले. दरम्यान, या प्रकरणी मानोरा पोलीस घटनेचा तपास करत आहे.

Ratnagiri Rajan Salvi News Update : आमदार राजन साळवींच्या पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला





Ratnagiri News : रत्नागिरी : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आमदार साळवींच्या पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला. लाच लूचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाचलुचपत विभागाकडून आमदार राजन साळवी पत्नी अनुजा राजन साळवी, शुभम राजन साळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेच्या भीतीने शुभम आणि अनुजा साळवी यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालय पुढे अर्ज दाखल करण्यात आला होता.

 





Amravati News : तिवसा येथे राज्यस्तरीय कबड्डीचा थरार
Amravati Kabbadi : मातीतला खेळ म्हणून कबड्डी हा प्रसिद्ध खेळ आहे, ग्रामीण भागात आजही मातीतल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जातं. अमरावतीच्या तिवसा येथे भाजप नेते राजेश वानखडे यांनी तीन दिवसीय राज्यस्तरीय महिला-पुरुष कबड्डी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात राज्यातील नामवंत चमू दाखल झाले होते. रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी उपस्थित लावत कबड्डीचा उत्साह वाढवला. पुरुष आणि महिलांचे थरारक सामने यावेळी बघायला मिळाले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजक राजेश वानखडे यांच तोंडभरून कौतुक करत पुढल्या वर्षी यापेक्षाही मोठं आयोजन करा, असं यावेळी म्हटलं. या कबड्डी स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.

 

 
Hindu Temple in Abu Dhabi : संयुक्त अरब अमिरातील पहिलं हिंदू मंदिर, उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू

Abu Dhabi Temple : पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन येत्या 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अबुधाबी येथील या मंदिरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर स्वामीनारायण संस्थेने संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधलं आहे. अबुधाबी येथून 40 किलोमीटर तर दुबई येथून 105 किलोमीटरवर हे मंदिर आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने जोरदार तयारी या ठिकाणी सुरू असल्याची काही Exclusive दृश्य "एबीपी माझा"च्या हाती आली आहेत. 

Lalit Kala Kendra News Update : ललित कला केंद्र प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक सचिन गाडेकर निलंबित

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी संध्याकाळी पाच वाजता तोडफोड करण्यात आली. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल निलंबन करण्यात आलय.  मात्र या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याच प्रत्यक्षदर्शींच म्हणणय.  कारण ललित कला केंद्राच्या कार्यालयाला शनिवार सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. अनेक पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी ललित कला केंद्राच्या भोवती तैनात होते.  एबीपी माझाने देखील शनिवारी दुपारी एक वाजता याविषयीची बातमी दाखवली होती. मात्र संध्याकाळी पाच वाजता हा बंदोबस्त अचानक बाजूला करण्यात आला ज्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना तोडफोड करण्यासाठी रान मोकळ झालं. त्यानंतर पोलीसांनी जाणीवपूर्वक ही तोडफोड होऊ दिली का हा प्रश्न विद्यापीठाच्या आवारात विचारला जातोय. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच निलंबन करण्यात आलय.  मात्र विद्यापीठात बंदोबस्तासाठी पन्नासहून अधिक पोलीस तैनात असताना तोडफोड झालीच कशी, अचानक पोलीस कॉन्स्टेबलस्ना बाजूला होण्याच्या सुचना कोणी दिल्या आणि या घटनेच खापर एकट्या पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांच्यावर का फोडल जातय या प्रश्नांची उत्तरं पुणे पोलिसांकडून अद्याप देण्यात आलेली नाहीत.

Yavatmal News : सिमेंट पाईप अंगावरून गेल्याने दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Yavatmal News : यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वडसद गावाशेजारी असलेल्या शेतामध्ये क्रिकेटची पीच सिमेंट पाईपने तयार करत असताना 10 वर्षीय चिमुकला त्या पाईप खाली आल्याने त्याच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. आर्यन जयेश चव्हाण असं मयत चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली. वडसद तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थी होता, घरची परिस्थिती बेताची असल्याने वडील जयेश चव्हाण ऊसतोड कामगार म्हणून काम करीत होते. घटनेच्या दिवशी त्याचे वडील ऊस तोडीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे मृत आर्यन हा आपल्या आजी-आजोबाकडे राहत होता. दरम्यान, या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.